---Advertisement---

नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, जाणून घ्या पहिल्या पाच क्रमांकावरील नावे

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. या स्टेडियमवरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. यापूर्वी हे स्टेडियम ‘मोटेरा’ या नावाने ओळखले जायचे. मात्र आता त्या स्टेडियमचे नूतनीकरण केले गेले असून त्याजागी भव्य असे नवे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ बांधले गेले आहे.

हे स्टेडियम आता जगभरातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने सगळ्यात मोठ्या असलेल्या स्टेडियमवर याआधी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचा हक्क होता. मात्र आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ वरील आसनक्षमता वाढवल्याने ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम ठरले आहे. याच निमित्ताने आजच्या लेखात आपण जगभरातील प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने सगळ्यात मोठ्या असलेल्या स्टेडियमबद्दल जाणून घेऊया.

१) नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद –

प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सगळ्यात मोठे स्टेडियम आहे. याची आसन क्षमता तब्बल १ लाख १० हजार आहे. मागील आठवड्यात झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही प्रेक्षक या स्टेडियममध्ये उपस्थित होते. मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे याच्या अर्ध्या म्हणजे ५५ हजार प्रेक्षकांनाच या सामन्याची तिकिटे विकल्या गेली होती.

२) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न –

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे नरेंद्र मोदी स्टेडियमपूर्वी जगातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम होते. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची प्रेक्षक क्षमता सुमारे १ लाख आहे. हे स्टेडियम ऑस्ट्रेलियातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक मैदानांपैकी एक आहे.

३) इडन गार्डन्स, कोलकाता –

भारताच्या कोलकाता शहरातील इडन गार्डन्सचे मैदान हे भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक महत्वाचे मैदान आहे. भारतीय संघाने आपले अनेक ऐतिहासिक विजय या मैदानावर मिळवले आहेत. या मैदानाला भारतीय क्रिकेटची ‘मक्का’ म्हणून देखील ओळखले जाते. या स्टेडियमची आसन क्षमता सुमारे ६६ हजार आहे.

४) शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम, रायपुर –

टॉप-५ मैदानाच्या यादीत या मैदानाचे नाव पाहून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल. कारण अजून या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नाहिये. त्यामुळे ते अनेकांना परिचित नाही. मात्र दर्शक क्षमतेच्या दृष्टीने हे स्टेडियम जगातील चौथ्या क्रमांकाचे स्टेडियम आहे. याची प्रेक्षक क्षमता सुमारे ६५ हजार आहे.

५) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैद्राबाद –

भारताच्या दक्षिणेतील हैद्राबाद येथे स्थित असलेले राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे भारतातील उत्कृष्ट स्टेडियमपैकी एक आहे. २००३ साली हे स्टेडियम बांधण्यात आले होते. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता सुमारे ६० हजार इतकी आहे. आयपीएलमधील सनरायझर्स हैद्राबादच्या संघाच्या सामन्यासह इतरही महत्वाचे सामने येथे खेळवले जातात.

महत्वाच्या बातम्या:

शुबमनवर चौथ्या कसोटीतून बाहेर होण्याची टांगती तलवार, १०० ची सरासरी असणारा खेळाडू घेणार जागा?

क्रिकेटला टाटा- बायबाय करत दुसरा व्यवसाय करणारे ५ क्रिकेटर, सचिनचा एकेवेळचा संघसहकारीही आहे यात

आयपीएल आयोजनात तीन संघांचा खोडा! हे कारण देत केली त्रयस्थ ठिकाणाची मागणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---