– अनिल भोईर
प्रो कबड्डी सीजन ७ ला २० जुलै पासून सुरुवात होत आहे. नवीन पर्वासाठी सर्वच संघाची जोरात तयारी सुरू आहे. सर्व संघाचे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरे सुरू आहेत. दिल्ली संघाचा हरियाना येथे सुरू आहे. प्रो कबड्डी सीजन ७ च्या पार्श्वभूमीवर दबंग दिल्लीच्या दबंग डिफेडर विशाल माने सोबत केलेली खास बातचीत:
प्रो कबड्डी सीजन ७ साठी फक्त १ महिना बाकी आहे, या नवीन सीजन साठी आपला संघ संतुलित आहे का ?
– संघात गेल्यावर्षी पेक्षा खूप बदल झाले आहेत, तरी जे अनुभवी जुने खेळाडु संघात कायम आहेत. नवीन खेळाडूंच्या मध्ये विजय मलिक हा अष्टपैलू खेळाडु आला आहे. तसेच इरणाचा एक लेफ्ट कव्हर सईद घाफारी जो वर्ल्ड कप खेळला आहे. अनिल कुमार म्हणून एक युवा खेळाडु आला आहे. आता आमचा कॅम्प हरियाना येथे सुरू आहे. मागील सीजन पेक्षा आमचा आताचा संघ खूप संतुलित वाटतो.
मागील पर्वात दबंग दिल्ली पहिल्यांदाच प्लेऑफस साठी पात्र ठरली होती, तर या नवीन सीजन मध्ये तशीच कामगिरी बघायला मिळेल का ?
– गेल्यावर्षी पेक्षा नक्कीच आम्ही चांगली कामगिरी करायचा प्रयत्न करू. सर्वच सामने जिंकणाचा आमचा टार्गेट असेल. त्यासाठी सर्वच खेळाडु मेहनत घेत आहेत, कोच व ट्रेनर सर्वांकडून चांगली तयारी करून घेत आहेत.
प्रो कबड्डी सीजन ७ चा वेळापत्रक जाहीर झाला आहे, नवीन फॉरमॅट बद्दल तुम्हाला काय वाटत ?
– मागील सीजन पेक्षा आताच फॉरमॅट मला सोपं वाटतं. याआधी होम लेग मध्ये पूर्ण आठवडा भर सामने खेळायला लागायचे आता तसा नाही, लेग मध्ये फक्त ४ सामने असल्यामुळे विश्रांती मिळेल.
प्रो कबड्डी मध्ये आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळणाचा विक्रम तुमच्या नावावर आहे, एवठा अनुभव असताना त्याप्रमाणे तुमची कामगिरी झाले का ?
– प्रो कबड्डी जास्त सामने खेळण्याचा विक्रम माझ्यावर असला तरी मला खंत वाटते की माझ नाव डिफेडरच्या यादीत जास्त गुण मिळण्यात आघाडीवर असते तर चांगला वाटलं असत. मागील एक-दोन सीजन मध्ये काही दुखापतीमुळे माझा परफॉर्मन्स कमी झाला होता. पण मला स्वतःचा आकडेवारी पेक्षा संघाचा विजय महत्वाचा वाटतो त्यामुळे संघाला विजय कसा मिळवून देता येईल यासाठी मी प्रयत्न करतो.
सीजन ७ मध्ये संघातील कोणते खेळाडु ठरवू शकतात ट्रम्प कार्ड ?
– संघातील सर्वच खेळाडु हे आपलं योगदान देतील यांत शंका नाही. पण आमच्या कडे एक जोकर असेल तो ट्रम्प कार्ड ठरवू शकेल, विजय मलिक. हा नवीन असल्यामुळे त्याचा खेळ जास्त कोणी बघितला नाही. मागील वर्षी आम्हाला जी कमी जाणवत होती ती विजय मलिक नक्की भरून काढणार असा आमचा विश्वास आहे. मागील सीजन मध्ये चमकदार कामगिरी करणारा नवीन कुमार आहे. जो मुख्य रेडरची भूमिका बजावेल. तसेच आमच्याकडे जोगिंदर व रविंदर ही अनुभवी जोडी आहेच.
कबड्डी खेळायला सुरुवात कधी पासून झाली ?
– कबड्डी तर मी लहानपणापासून खेळत होतो. माझा जन्मच लालबाग मध्ये झाला. मध्य मुंबई म्हणजे कबड्डीची पंढरी समजली जाते. डॉ शिरोडकर शाळेत असताना कबड्डी खेळत होतो, त्यानंतर महर्षी दयानंद कॉलेज, परेल ला प्रेवश घेतला. कबड्डी खेळाने एमडी कॉलेजला खूप ओळख मिळवून दिली आहे. तसेच एमडी कॉलेजमध्ये खूप राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडु घडले आहेत. तिकडे असताना शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश पडावे सरांचा मोलाचा मार्गदर्शन लाभला.
व्यावसायिक कबड्डी खेळायला कशी सुरुवात झाली ?
– देना बँककडून पहिल्यांदा व्यवसायिक कबड्डी खेळायला संधी मिळाली. कॉलेज पातळीवर खेळणाऱ्या युवा खेळाडूना देना बँक संधी द्यायची. तेव्हा माझा चांगला परफॉर्मन्स झाला. वयाच्या १९ व्यावर्षी मला सिनियर नॅशनल खेळायला मिळाली. त्यानंतर मला महिंद्रा अँड महिंद्रा कडून २ वर्ष खेळायला मिळाला. माझी कामगिरी बघून मला सेंट्रल रेल्वेने खेळायची संधी दिली. रेल्वेकडून खेळत असताना सिनियर नॅशनल मध्ये मला सुवर्णपदक मिळाला होता. तेव्हा मनजीत चिल्लर, राकेश कुमार यांच्याबरोबर रेल्वेच्या संघात खेळलो.
त्यावेळी मध्य रेल्वे विरुद्ध भारत पेट्रोलियम यांच्यात खूप व्यावसायिक सामने व्हायचे. तेव्हा माझा लेफ्ट व रिघट दोन्ही कव्हरला पेरफॉर्मन होत होता त्यामुळे मला भारत पेट्रोलियमने जॉबची ऑफर दिली. भारत पेट्रोलियम ने क्लास ३ मध्ये जॉब करण्याची ऑफर दिली त्यामुळे रेल्वेत क्लास ४ चा जॉब सोडून मी भारत पेट्रोलियम मध्ये रुजू झालो. भारत पेट्रोलियम मध्ये आल्यावर मला पूर्ण वेळ कबड्डीवर लक्ष देता आला. प्रताप शेट्टी सरांनी खूप नवीन गोष्टी सांगितल्या.
भविष्यात कबड्डीत तुमची काही स्वप्न आहेत का ?
– खरंतर खेळाडूंची स्वप्न कधी पूर्ण होत नाही. म्हणजे एखादी गोष्ट मिळवली तरी खेळाडूला त्यापेक्षाही मोठी गोष्टी मिळवण्याची इच्छा असते. माझं प्रत्येकवेळी एकच उद्देश असतो की आपण ज्या संघात खेळतो त्यासंघासाठी आपलं १०० टक्के योगदान देऊन संघाला विजय मिळवून द्यायचा. आता सध्या माझं लक्ष प्रो कबड्डी आहे त्यामुळे दबंग दिल्ली संघाला विजय मिळवून देण्याचा माझं प्रयत्न असेल.
आता शिबिरात तुमच्या फिटनेस साठी काय केलं जातं ?
– फिटनेस खूप चांगला सुरू आहे, आमचे फिटने कोच संदीप रांगणेकर सरांनी माझी स्वतःची ट्रेनिंग लिलावानंतर अंधेरी येर्थे सुरू केली. कॅम्प मध्ये सकाळी ६ वाजता फिटनेस असते त्यानंतर ट्रेनिंग घेतली जाते. संध्याकाळी कोच कृष्ण कुमार हुडा सरांनाकडून कोचिंग दिली जाते. मागील सीजन मध्ये काय-काय चुका झालेल्या त्यावर मार्गदर्शन दिलं जात आहे. महत्वाचा बदल असा झालाय की आमचे फिजियो रसेल पिंतो सर आम्हाला प्रत्येक सत्रा आधी आणि सत्रा नंतर किती थकलेलो आहोत हे विचारतात आणि त्याप्रमाणे आमचा पुढचा सत्राचा कार्यक्रम तयार केला जातो त्यामुळे प्रत्येक खेळाडूला त्याच्या क्षमतेनुसार विश्रांती दिली जाते, ही नवीन गोष्टी कबड्डी साठी खूप महत्वाची आहे.
प्रो कबड्डीत विशाल मानेची कामगिरी:
सामने- १०५
गुण- १७०
सुपर टॅकल- ९
हायफाय- ८