टीम इंडियाची लॉर्ड्स कसोटीत अवघ्या 22 धावांनी झालेल्या पराभवाने फक्त भारतीय खेळाडूंचंच नाही, तर संपूर्ण चाहत्यांचंही मन तुटलं. एक वेळ अशी होती की टीम इंडिया सामना जिंकू शकत होती, पण अचानक सर्वकाही उलटं झालं. मोहम्मद सिराजची दुर्दैवी चूक, टॉप ऑर्डरचा अपयश, बेजबाबदार फटके, आणि नितीश रेड्डीला वॉशिंगटन सुंदरनंतर पाठवणं. या सगळ्याचा सामना हरण्यावर परिणाम झाला.
मात्र, माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मते, या सामन्यातला खरी निर्णायक क्षण होता रिषभ पंतचा रनआऊट. त्यांनी केएल राहुलच्या शतकासाठी एक रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि थेट धावबाद झाले.
गावस्कर म्हणाले, “हा सामन्याचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता. राहुल शांत, संयमी खेळ करत होता आणि पंत आक्रमक फटके मारत होता- दोघांची भागीदारी म्हणजे आग आणि बर्फाचा संगम होता. इंग्लंडच्या गोलंदाजीवर त्यांनी दबाव आणला होता.”
त्यांनी पुढे सांगितले, “लंचच्या अगोदरचा शेवटचा तास होता. त्यात पंत धावबाद झाला आणि तिथून सगळं बदललं. संघ नंतर 100 रन्सपर्यंत पोहोचले खरे, पण असा रनआउट मनात रुतून बसतो. कदाचित त्यामुळेच राहुलही शतकानंतर चुकला आणि आउट झाला.”
त्यावेळी राहुल आणि पंत यांची 141 धावांची भागीदारी झाली होती आणि पंत 74 धावा करत धमाकेदार फलंदाजी करत होता. याच जोडीच्या जोरावर भारताने इंग्लंडच्या 387 धावांच्या पहिल्या डावाला टक्कर दिली होती.
गावस्करांचं म्हणणं आहे की, अशा प्रकारे दोन सेट फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाले की नव्या फलंदाजांवर प्रचंड दबाव येतो आणि खेळ पुन्हा उभारणं कठीण होतं. भारतासाठी हाच क्षण निर्णायक ठरला.





