रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. परंतु तेथील दोन अनोख्या चाहत्यांनी सर्वांची मने जिंकली होती. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका भारतीय प्रेक्षकाने सामना सुरू असताना, आपल्या ऑस्ट्रेलियन प्रेयसीला सर्वांसमक्ष प्रपोज केले होते. मागील दोन दिवसांपासून या अजब घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आता, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या जोडप्याशी झालेल्या संभाषणाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे सर्वांना आपल्या लग्नासाठी निमंत्रित करत असल्याचे दिसून आले.
दुसऱ्या वनडे सामन्यावेळी घातली होती प्रेयसीला लग्नाची मागणी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यावेळी दिपन नावाच्या भारतीय तरुणाने आपल्या रोझ नामक ऑस्ट्रेलियन प्रेयसीला लग्नाची मागणी घातली होती. चालू सामन्यातच अशा जगावेगळ्या प्रकारे मागणी घातल्याने रोझ अचंबित झाली होती. मात्र, त्यानंतर तिने दिपनच्या मागणीचा स्वीकार केला. ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने टाळ्या वाजवत या युगलाचे अभिनंदन केले होते. गेले दोन दिवस त्यांच्या या अनोख्या प्रपोज व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याचवेळी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्या दोघांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला आहे. एका टेलिव्हिजन प्रतिनिधीने दिपन व रोझ यांच्याशी बोलताना त्यांना काही प्रश्न विचारले.
https://twitter.com/cricketcomau/status/1333290915541225472
असे झाले संभाषण
टेलिव्हिजन प्रतिनिधीने सर्वप्रथम रोझ हिला प्रश्न विचारला. त्याने विचारले, “हा असे काही करणार आहे हे तुला माहीत होते का?”
त्यावर तिने उत्तर दिले की, “मला याचा जरासाही अंदाज नव्हता. मात्र, आता खूप छान वाटत आहे.”
दिपन याला प्रश्न विचारताना तो प्रतिनिधी म्हणाला, “आपल्या आयुष्यातील इतक्या महत्त्वाचा निर्णयासाठी ही जागा खूप शानदार वाटतेय ना?”
त्यावर उत्तर देताना दिपन म्हणाला, “होय ही खूपच शानदार जागा आहे. कारण आम्ही दोघेही क्रिकेटप्रेमी आहोत आणि यासाठी दुसरी उचित जागाच आम्हाला सापडली नसती. या घटनेचे संपूर्ण जग साक्ष बनले आहे.”
टीव्ही प्रतिनिधीने शेवटचा प्रश्न रोझ हिला विचारताना म्हटले, “येथे उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांना लग्नाचे आमंत्रण असेल का?”
त्यावर उत्साहित होऊन रोझ म्हणाली, “नक्कीच तुम्हा सर्वांना आमच्या लग्नाचे आमंत्रण असणार आहे.”
https://twitter.com/scg/status/1332985081326039041
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या नवीन जोडप्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘याला कोणीतरी चांगले बूट घेऊन द्या रे’, केएल राहुलची उडवली जातेय खिल्ली
ट्रेंडिंग लेख-
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव
रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी लागू शकते ‘या’ तीन दिग्गजांची वर्णी
विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या






