क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यामध्ये शेवटच्या क्षणालाही विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या संघाला पराभवाचा धक्का बसू शकतो. सध्या जगातील सर्वात मोठी असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगचा १५वा हंगाम खेळला जात आहे. यामध्ये याचा प्रत्यय आला आहेच. या स्पर्धेतील ४ सामने आतापर्यंत पार पडले आहेत. चौथा सामना सोमवारी (२८ मार्च) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. हा सामना गुजरातने ५ विकेट्सने खिशात घातला आणि स्पर्धेला विजयी सलामी दिली. हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना होता. गुजरात संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या, तर लखनऊ संघाचे नेतृत्व केएल राहुल करत होता. या सामन्यात राहुलच्या विजयाच्या स्वप्नांना दोन खेळाडूंनी सुरुंग लावला. एक म्हणजे, त्याचा ‘गावकरी’ आणि दुसरा म्हणजे ‘नावकरी.’ कोण आहेत हे दोन खेळाडू चला जाणून घेऊया.
झालं असं की, नाणेफेक जिंकून हार्दिक पंड्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या होत्या. या धावा करताना लखनऊचा कर्णधार केएल राहुल सामन्यातील पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. हे त्यांच्यासाठी खूपच दुर्दैवी होते. लखनऊचे फक्त दोन फलंदाज चमकले. त्यांनी अर्धशतक झळकावले. एक म्हणजे दीपक हुड्डा आणि दुसरा खेळाडू आयुष बदोनी. हुड्डाने ५५ धावा झळकावल्या, तर बदोनीने ५४ धावा ठोकल्या.
लखनऊने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना गुजरात संघाचीही सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पावरप्लेमध्ये शुबमन गिल (० धावा) आणि विजय शंकर (४ धावा) यांच्या रूपात संघाला झटका बसला. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड (३० धावा), कर्णधार हार्दिक पंड्या (३३ धावा) आणि डेविड मिलरने (३० धावा) आपापले योगदान दिले. मात्र, सामना अजून संपला नव्हता, तेव्हा खालच्या फळीतील फलंदाज राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि अभिनव सदारंगानी (Abhinav Sadarangani) यांनी आपली जबाबदारी ओळखत कडवी झुंज दिली. राहुल तेवतियाने २४ चेंडूत नाबाद ४० धावा ठोकल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ५ चौकार मारले. तसेच, सदारंगानीने ७ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १५ धावांचे योगदान दिले आणि संघाला ५ विकेट्सने सामना जिंकून दिला.
एक ‘नावकरी’, तर दुसरा ‘गावकरी’
विशेष म्हणजे, या सामन्यात महत्त्वाच्या क्षणी चमकदार कामगिरी केल्यामुळे राहुल तेवतिया आणि अभिनव सदारंगानी चमकले. महत्त्वाचं म्हणजे सदारंगानी हा लखनऊचा कर्णधार केएल राहुलचा गाववाला आहे. केएल राहुल आणि सदारंगानी यांचा जन्म कर्नाटकचा आहे. दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघासाठी खेळतात. त्यामुळे विस्फोटक खेळी करत ‘नावकरी’ राहुल तेवतिया आणि ‘गावकरी’ अभिनव सदारंगानी या दोन्ही खेळाडूंनी राहुलच्या स्वप्नांना सुरुंग लावला.
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरात टायटन्सच्या ऐतिहासिक विजयाचे तीन हिरो; कामगिरी अशी की, लखनऊ संघानेही टेकले गुडघे
आयपीएलमध्ये इतक्या फ्रँचायझी, त्यांचे इतके बॉलर… पण शमीने गुजरातसाठी जे केले ते ऐतिहासिकच
छोटा पॅकेट बडा धमाका! गुजरातविरुद्ध वादळी खेळी करणारा आयुष बदोनी आहे तरी कोण? पंड्यालाही फोडलाय घाम