दुखापतीनंतर सावरून मैदानावर परतणे हे काही सोपे नाही. खूपच कमी लोक त्यातून पुनरागमन करतात. लखनऊ सुपर जायंट्सच्या (एलएसजी) गोलंदाजाचीही काही अशीच स्थिती आहे. दुखापतीनंतर १४-१५ महिन्यांच्या रिहॅबिलिटेशननंतर (पुनर्वसन) आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या एलएसजीचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खान याने त्याच्या मैदानावरील परतल्याबाबतचे वक्तव्य केले आहे. त्याने त्याच्या आईच्या प्रेरणेमुळे संघात परत येऊ शकलो, असे म्हटले आहे.
“दुखापतीमुळे दीर्घकाळ खेळापासून दूर राहिल्याने माझ्या मनात शंका निर्माण झाली होती, मात्र मी बरा होत असताना माझ्या आईने मला प्रोत्साहन दिले. जेव्हा मी स्पर्धात्मक क्रिकेटसाठी उपलब्ध नव्हतो आणि शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनाच्या काळात अनेकदा माझ्या मनात नकारात्मक विचार आले,” असे मोहसिन म्हणाला.
“मी १४-१५ महिने मैदानाबाहेर असल्याने मला पुन्हा खेळता येईल की नाही अशी शंका वाटत होती. तेव्हा माझ्या आईने मला पाठिंबा दिला आणि तू पुन्हा खेळशील असा विश्वास दिला,” असेही मोहसिन म्हणाला. त्याच्या आईचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे.
मोहसिन पुढे म्हणाला, “मी पुन्हा आयपीएल आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळावे असे माझ्या आईचे स्वप्न होते. मी एलएसजीच्या शिबिरात होतो आणि बंगळुरूहून परतलो, त्याच दिवशी तिचे निधन झाले. त्यानंतर मी एक महिना सराव केला नाही. “
मोहसिनने त्याची तंदुरुस्ती आणि लय पुन्हा मिळवण्यासाठी एलएसजीचे फिजिओ वैभव डागा, ट्रेनर सोहम आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी केलेल्या मदतीचे आभार मानले आहे. “मी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसोबत त्याच्या अमरोहावरील फार्मवर सराव केला. त्याने तेथे एक चांगले जिम आणि मैदान उभारले आहे. त्याच्याशी चर्चा करताना त्याने माझ्यामधील उणिवांबद्दल सांगितले,” असेही मोहसिन पुढे म्हणाला आहे.
मोहसिन २०२५ च्या हंगामात एकही सामना न खेळू शकल्यानंतरही त्याला एलएसजीने रिटेन केले. त्याने २०२६ च्या हंगामात परतल्यानंतर आपल्या तिसऱ्याच चेंडूत विकेट घेतली. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या त्या सामन्यात नितीश राणाला बाद केले. त्याचबरोबर हंगामातील पहिली मेडन ओव्हर (निर्धाव षटक) टाकली. तो सामना संघाने गमावला असला तरी मोहसिनने चांगले पुनरागमन केले. त्याने ४ षटकात १९ धावा देत एक विकेट घेतली.






