जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या 5 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या नव्या हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केलीये. या दरम्यानच आपल्या दुसऱ्याच वर्षी विजेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मागील हंगामात संघासाठी पदार्पण करून जबरदस्त कामगिरी करणारा युवा वेगवान गोलंदाज मोहसीन खान दुखापतग्रस्त झाला असून, तो या हंगामातील सुरुवातीच्या टप्प्याला मुकण्याची शक्यता आहे.
मोहसीन खान याने मागील वर्षी घातक गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मोहसीनने आपल्या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजीने 9 सामने खेळताना 14 बळी आपल्या नावे केलेले. मागील हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात त्याचा खेळ चांगलाच बहरलेला. विशेष म्हणजे त्याचा इकॉनॉमी रेट सहा पेक्षाही कमी होता. मात्र, यावर्षी तो आयपीएलमध्ये सुरुवातीपासून खेळताना दिसण्याची शक्यता कमी झाली आहे.
मोहसीन सध्या लखनऊ संघासह कॅम्प मध्ये आहे. मात्र, तिथे तो अधिकची गोलंदाजी करत नाही. त्याच्या डाव्या हाताच्या खांद्याला दुखापत झाली असून, त्यातून सावरण्यासाठी त्याला आणखी महिनाभराचा कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत लखनऊ संघाने त्याला पर्याय म्हणून आयपीएल लिलावात अनुभवी जयदेव उनाडकतला संघाचा भाग बनवलेले.
उंचपुरा वेगवान गोलंदाज असलेला मोहसीन मागील सहा वर्षापासून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यापूर्वी त्याची मुंबई इंडियन्स संघात देखील निवड झाली होती. मात्र, त्या ठिकाणी त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ संघाने मागील वर्षी आपल्या पहिल्याच हंगामात प्ले ऑफपर्यंत मजल मारण्याची कामगिरी करून दाखवलेली. यावेळी त्यांचे ध्येय विजेतेपद पटकावण्याचे असेल.
(Lucknow Supergiants Young Pacer Mohsin Khan Doubtful For Full IPL 2023 Due To Injury)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL2023 । पराभवाचा वचपा काढत मुंबईची फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; इलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सची धुळधाण
VIDEO । एलिमिनेटर सामन्यात हरमनप्रीतवर नामुष्की, यूपीच्या सोफीने केले क्लीन बोल्ड