आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या संघातील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडोर्फ आणि दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एन्गिडी हे आगामी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याला मुकणार आहेत. सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी याबद्दलची पुष्टी केली आहे. १६ एप्रिल रोजी मुंबईत हा सामना होणार आहे.
जोश हेझलवुडच्या जागी संघात समाविष्ट झालेला बेरेनडॉर्फ अद्याप संघात सामील झाला नसून एन्गिडीचाही सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी अद्याप संपलेला नाही.
दिल्लीविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत फ्लेमिंग यानी म्हटले आहे की, “एन्गिडी हा पुढील सामन्यासाठी संघात सहभागी होणार नसून तत्पूर्वी हेजलवुड हा आमच्या योजनेचा भाग होता. परंतु त्यानेही या स्पर्धेतून माघार घेतली असल्याने आमच्यासाठी परिस्थिती कठीण बनली आहे. परंतु एन्गिडी लवकरच संघात दाखल होईल अशी आशा आहे. तसेच बेहरेनडॉर्फही लवकरच आमच्या ताफ्यात सामील होईल. याक्षणी आमच्या संघाची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. परंतु आमच्याकडे प्रतिभावान भारतीय गोलंदाजांसमवेत सॅम करन या परदेशी गोलंदाजाचा पर्याय आहे.”
दिल्लीकडून झालेल्या पराभवाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, “एका पराभवाने तसा काही फारसा फरक पडत नाही आणि पुढच्या सामन्यात आम्ही पुनरागमन करू. आमच्याकडे आता येथे खेळण्यासाठी आणखी चार सामने आहेत. पुढील सामन्यात आम्हाला या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. कारण आमचा संघ चेन्नई संघ आहे. आमची मानसिकता बदलण्यास आणि अधिक मजबूत होण्यास जास्त वेळ लागणार नाही.”
तसेच ते म्हणाले, “मुंबई इंडियन्सलाही चेन्नईत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पहिला सामना खेळताना त्यांनाही तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे कसे अवघड जात होते हे आम्ही पाहिले आहे. चेन्नईतील परिस्थितीनुसार स्वतःला घडवणे हे त्यांच्यासमोर एक आव्हान आहे. त्याचप्रमाणे वानखेडेच्या खेळपट्टीनुसार आम्हालासुद्धा आपली गोलंदाजीची रणनीती बदलवण्याची आवश्यकता असून कोविड -19 च्या काळात आपल्या सर्वांसाठी हे एक मोठे आव्हान असणार आहे.”
तसेच सुरेश रैनाच्या परतण्याने संघाला अधिक बळकटी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, “रैनाला पुन्हा संघासाठी खेळताना पाहून आनंद होत आहे. त्याने 36 चेंडूत 54 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्याला लवकरात लवकर सूर गवसावा अशी आमची इच्छा होती आणि 2-3 फटके खेळल्यानंतर त्याला ते साध्य झाले. सुरुवातीच्या खराब खेळी नंतर रैना आणि मोईन अलीने ज्या प्रकारे डाव सावरला तो आमच्यासाठी सकारात्मक होता. तसेच आम्ही गोलंदाजीतही चांगली कामगिरी करू शकलो असतो, परंतु त्यामध्ये आम्हाला अपयश आले. जे आमच्यासाठी खूप निराशाजनक होते”
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: भर सामन्यात जडेजाने दिल्लीच्या गोलंदाजाला घातली धसकी, डोळे मोठे करत दाखवली भिती!