भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिला दिवस इंग्लंड संघाच्या नावे राहिला त्यानंतर दुसऱ्या दिवशीही कर्णधार जो रूट याने उत्कृष्ट खेळी करत दुहेरी शतक झळकावले आहे. अशातच भारतीय गोलंदाजांना इंग्लिश फलंदाजांना बाद करणे कठीण जाताना दिसत आहे. त्यामुळे दुखापती नंतर संघात पुनरागमन करणाऱ्या ईशांत शर्मानेही काही खास प्रदर्शन नाही केले, असे मत पूर्व भारतीय क्रिकेटपटू मदन लाल यांनी व्यक्त केले आहे.
चेन्नई कसोटीबद्दल बोलतांना मदन लाल यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ३ जलद गोलंदाज आणि २ फिरकी गोलंदाजांसोबत मैदानात उतरायला हवे होते. यासोबतच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराज याला ही संघात स्थान द्यायला हवे होते.”
मोहम्मद सिराजची कसोटी सामन्यातील कामगिरी
नुकतेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या उत्कृष्ट गोलंदाजी मुळे भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या मोहम्मद सिराज याला इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान मिळाले नाही. सिराजने खेळलेल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत. यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध घेतलेल्या चौथ्या आणि अंतिम सामन्यातील ५ विकेट्सचाही समावेश आहे.
चुकीच्या गोलंदाजी क्रमाची निवड
“माझ्या मते भारतीय संघाने योग्य गोलंदाजी क्रम घेऊन मैदानात उतरायला हवे होते. संघाने ३ जलद गोलंदाज आणि २ फिरकी गोलदाजांना घेऊन मैदानात उतरायचे होते. ईशांत शर्मा नुकताच दुखापतीतून बाहेर आला आहे, यामुळे त्याला १ -२ कसोटी सामन्यानंतर खेळवायला हवे होते. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजलाही बाहेर बसवण्यापेक्षा खेळवायला हवे होते”, असे मत मदनलाल यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
नासिर हुसेन यांनी उधळली जो रूटवर स्तुतिसुमने, म्हणाले
कोणाचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्तम? आयसीसीने घेतलेल्या पोलमध्ये या खेळाडूला मिळाली सर्वाधिक मते
आयपीएल गाजवणाऱ्या एनरिच नॉर्टजेची पाकिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ





