भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज मदन लाल (madan lal) यांनी विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शनिवारी (१५ जानेवारी) विराट कोहली (virat kohli) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराटच्या या निर्णयानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक दिग्गजांनी विराटच्या निर्णयानंतर त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अशातच आता मदन लाल देखील व्यक्त झाले आहेत.
विराटच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर मदन लाल म्हणाले की, “अशाप्रकारचे निर्णय व्यक्तिगत असतात. मी फक्त एवढेच म्हणेल की, त्याचे यश नेहमीच त्याच्या सोबत असेल. तो जगातील चौथा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तो ज्याप्रकारे नेतृत्व करत होता, असे वाटले नव्हते की, तो कर्णधारपद सोडेल. मी या निर्णयामुळे हैराण आहे. तो एक असा कर्णधार होता, ज्याला नेहमीच जिंकायचे होते. टीव्हीवर आपण त्याला कर्णधारपदाचा आनंद घेताना पाहत होतो, पण अचानक त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन एक धमाका केला आहे. हे आश्चर्यकारक होते.”
“कोहलीनेच हा संघ तयार केला आहे. त्यामुळे मी त्याला नेतृत्व करताना बघू इच्छित होतो. आपण कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आलो. त्याने वेगवान गोलंदाजीला जिवंत केले आणि एक मजबूत संघ बनवला. हे त्याचे यश आहे. जेव्हा तुम्ही कसोटी सामना जिंकता, तेव्हा एकदिवसीय आणि टी२० वर देखील याचा परिणाम होतो. या व्यक्तीने सर्वकाही केले आहे. त्याने एका कर्णधाराच्या रूपात संघाला मजबूत बनवण्यासाठी कमतरता शोधून काढल्या. आज या मजबूत भारतीय संघाचे संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जाते.” असे मदन लाल पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराटला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णदारपदावरून हटवले गेले होते. दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला एकदिवसीय संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले होते. तसेच, टी२० विश्वचषक संपल्यानंतर विराट स्वतःच्या इच्छेने टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. रोहित शर्मा सध्या भारताच्या टी२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे.
महत्वाच्या बातम्या –
खुद्द रोहितच कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लावण्यात बनतोय अडथळा, पण कसं? वाचा सविस्तर
हरभजन सिंगने निवडली त्याची ‘ऑल टाइम इलेव्हन’; विराटला जागा दिली, पण नेतृत्त्वपद नाही
विराट अजूनही ऍड आणि कॉर्पोरेट वर्ल्डचा आहे ‘संघनायक’, वर्षाची कमाई ऐकून विस्फारतील डोळे
व्हिडिओ पाहा –