रिआल माद्रीद आणि मँचेस्टर युनाइटेड यांच्यात काल रात्री झालेल्या युएफा सुपर कपच्या सामन्यात रिआल माद्रीद संघाने मँचेस्टर युनाइटेड संघाला २-१ असे हरवले आणि हा सुपर कप आपल्या नावे केला. १९९० ए.सी. मिलनानंतर सलग दोन वर्ष सुपर कप जिंकणारा माद्रीद हा पहिलाच संघ बनला आहे. रिआल माद्रीद संघाकडून कॅसेमेरो आणि इस्को यांनी गोल केले तर मँचेस्टर युनाइटेडसाठी लुकाकूने गोल नोंदवला.
या सामन्यात दोन्ही संघाने आक्रमक खेळ केला. मँचेस्टर युनाइटेड संघाची या सामन्यात पकड जास्त होती असे जाणवते. पहिल्या सत्रात १७ व्या मिनिटाला मँचेस्टर संघाला गोल करण्याची संधी आली होती पण पोग्बाने मारलेला फटका रिआलचा गोलरक्षक केलोर नावासच्या सुरक्षित हातात गेला. तर २४ व्या मिनिटाला रिआल माद्रीदच्या कॅसेमेरोने गोल करत माद्रीद संघाला आघाडीवर नेले. पहिले सत्र संपले तेव्हा माद्रिद संघ १-० अश्या आघाडीवर होता.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला माद्रीद संघाने आक्रमक खेळ केला. बॉक्समध्ये इस्कोने चाल रचली आणि ५२ व्या मिनिटाला त्यानेच गोल करत माद्रीद संघाची आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर मँचेस्टर संघाने आक्रमणे वाढवली. ६२ व्या मिनिटाला त्यांच्या आक्रमणांना यश आले आणि रोमेलू लुकाकूने रिबाउंडवर गोल केला. त्यानंतर दोन्ही संघाकडून गोल करण्याचे खूप प्रयन्त झाले पण कोणालाही गोल करता आला नाही आणि हा सामना रिआल माद्रीदने २-१ असा जिंकत सुपर कपवर आपले नाव कोरले.
रिआल माद्रीदने चार वेळेस हा चषक जिंकला आहे. मँचेस्टर युनाइटेडने हा चषक फक्त १ वेळा १९९१ साली जिंकला आहे.