कलकत्ता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ” ४५ व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” आज तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांना गोव्याने कडवी लढत दिली. अखेर ५-५ चढायांच्या जादा डावात महाराष्ट्राने गोव्यावर ४८-४३ (९-४) अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पहिल्या डावात २९-१३ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राला दुसऱ्या डावात मात्र गोव्याने चांगलेच जेरीस आणले. पूर्ण डावात शेवटी ३९-३९ अशी बरोबरी झाली. सामन्याचा निकाल लावण्यासाठी ५-५ चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. यात महाराष्ट्राने ९-४ अशी ५ गुणांनी बाजी मारली. असलम इनामदारचा अष्टपैलू खेळ आणि पंकज मोहिते, सौरभ पाटील यांच्या चढाया या विजयात महत्वाचा ठरला.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने तेलंगणावर ३७-३१ अशी मात केली. पहिल्या डावात १७-१८अशा १ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने नंतर मात्र स्वतःला सावरत हा विजय साकारला. महाराष्ट्राच्या पंकज मोहिते, सौरभ पाटील, तेजस पाटील यांच्या चढाया, वैभव गर्जेच्या पकडी, तर असलम इनामदार, राजू कथोरे यांचा अष्टपैलू खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला.
सुरुवातीपासून चुरशीनें खेळला गेलेल्या या सामन्यात गुणफलक सतत दोलायमान स्थितीत पुढे सरकत होता. शेवटी महाराष्ट्राने बाजी मारत उपांत्य फेरी गाठली.
एकीकडे मुले विजय मिळवीत असताना मुलींना मात्र छत्तीसगड कडून पराभव पत्करावा लागला. छत्तीसगडने महाराष्ट्रावर ३६-२४ अशा मोठ्या फरकाने मात दिली. मध्यांतराला ०९- १२ अशा ३गुणांनी पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राला पुन्हा सावरता आले नाही.
प्रतीक्षा तांडेल वगळता आज अन्य कोणाची मात्रा चालली नाही. सोनाली हेळवी देखील या सामन्यात निस्तेज ठरली. उत्तरार्धात सलग ६ बोनस आपल्या बचावातून गेल्यामुळे चढाईपट्टू वर त्याचा ताण आला. हा फरक भरून काढण्याच्या नादात त्यांच्या पकडी होत गेल्या आणि आपल्याला पराभव दिसला. फक्त खेळाडू चांगले असून चालत नाहीत, तर त्यांना नियंत्रित करणारी यंत्रणा तेवढीच सक्षम पाहिजे. तरच आणि तरच संघाची प्रगती होते.
४५ व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय स्पर्धा, कोलकता
मुले उपांत्य फेरी सामने
१) महाराष्ट्र विरुद्ध चंदीगड
२) उत्तरप्रदेश विरुद्ध तामिळनाडू
मुली उपांत्य फेरी सामने
१) साई विरुद्ध उत्तरप्रदेश
२) हरियाणा विरुद्ध छत्तीसगड