पुणे। आज(7 जानेवारी) 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने विजय मिळवत मानाची चांदीची गदा पटकावली आहे. त्याने लातूरच्या शैलेश शेळकेचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. त्यामुळे हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरी होणारा नवा पैलवान ठरला.
हर्षवर्धनने विजय मिळवल्यानंतर त्याला चमचमणारी मानाची चांदीची गदा देण्यात आली. या गदेला मोठी परंपरा आहे.
या मानाच्या गदेबद्दल ही खास माहिती –
आजपर्यंत महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानाला अनेक मोठी बक्षिसे देण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मिळणाऱ्या चांदीच्या गदेला बाकी कोणत्याही बक्षिसाची सर नाही. ही गदा या सर्व बक्षिसांपेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे.
ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाते. गेल्या 36 वर्षांपासून मोहोळ कुटुंबाकडून ही चांदीची गदा दिली जाण्याची परंपंरा अखंडीत सुरु आहे.
ही गदा पुण्यात तयार होते. ही महाराष्ट्र केसरीची मानाची गदा गेली 28 वर्षांपासून पुण्यातील ‘पानगरी’ कुटुंब तयार करतात. पेशव्यांच्या पिढीतील सातवे वारस असणारे प्रदीप प्रतापराव पानगरी हे दरवर्षी ही गदा बनवण्याची काम करतात.
1882 पर्यंत ही मानाची गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेकडून दिली जात होती. पण कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा माजी खा. अशोक (अण्णा) मोहोळ यांनी मामासाहेबांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी होणाऱ्या मल्लाला ही गदा देण्याची परंपरा सुरु केली. मोहोळ कुटुंबाकडून ही गदा स्वखर्चाने बनवली जाते.
अशी असते महाराष्ट्र केसरीची गदा –
उंची – 27 ते 30 इंच. व्यास – 9 ते 10 इंच.
वजन – 10 ते 12 किलो
अंतर्गत धातू – अंतर्गत सागवानी लाकूड व त्यावर अत्यंत कोरीव काम आणि आकर्षक पिळे
बाह्य धातू – 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्रा. त्यावेर कोरीव काम व झळाळी. गदेच्या मध्यभागी स्व.मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवली असते व बरोबर 180 अंश फिरवून हनुमानाचे चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवले असते.