महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कबड्डी स्पर्धेत ठाणे मनपा, मुंबई बंदर, जे एस डब्ल्यू अजिंक्य

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या” शहरी व्यावसायिक पुरुषांत मुंबई बंदरने आणि ग्रामीण व्यावसायिक पुरुषांत रायगडच्या जे. एस. डब्ल्यू. स्टीलने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. महिलांत हा मान ठाणे मनपाने मिळविला. मुंबई बंदरचा शुभम कुंभार शहरी पुरुषांत, तर ठाणे मनपाची श्रद्धा पवार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोघांनाही प्रत्येकी रु. ५,०००/-चा धनादेश देऊन गौरविण्यात आले. तर जे. एस. डब्ल्यू. स्टीलचा राज पाटील ग्रामीण पुरुषांत स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रु.३,०००/- चा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

प्रभादेवी-मुंबई येथील हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनाच्या मैदानावर संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शहरी व्यावसायिक पुरुषांत गतविजेत्या मुंबई बंदर संघाने चुरशीच्या लढतीत सेंट्रल बँकेचा कडवा प्रतिकार २८-१४ असा मोडून काढत “कामगार चषक” व रु.५०,०००/- चा धनादेश आपल्या खात्यात जमा केला. उपविजेत्या बँकेला चषक व रु. ३५,०००/- च्या धनादेशावर समाधान मानावे लागले.

मुंबईच्या शुभम कुंभारने पहिल्याच चढाईत गडी टिपत आपला इरादा स्पष्ट केला. बँकेनेही जशास तसे उत्तर देत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. हा सिलसिला विश्रांतीपर्यंत सुरू होता. विश्रांतीला ११-०९ अशी आघाडी मुंबई बंदर संघाकडे होती. विश्रांतीनंतर मुंबईने आपला गिअर बदलला. तरी देखील मुंबईला बँकेवर पहिला लोण देण्याकरिता विश्रांतीनंतरच्या खेळात देखील १४ मिनिटे लागली. मुंबईच्या भीमकाय देहयष्टीच्या स्मितील पाटीलने बँकेचे शिल्लक असलेले २ गडी टिपत लोण देत मुंबई बंदरला २८-१२अशी आघाडी मिळवून दिली. या मुंबई बंदरने घेतलेल्या आघाडीने बँकेचे अवसान गळून गेले. शेवटी १४ गुणांच्या फरकाने मुंबई बंदरने विजेतेपद राखण्यात यश मिळविले.

पूर्वार्धात स्मितील पाटीलला रोखण्यात बँकेला यश आले होते, पण उत्तरार्धात त्यात त्यांना अपयश आले. यामुळेच बँकेला पराभवाचा सामना करावा लागला. पाटीला या विजयात चढाईत शुभम कुंभारची, तर पकडीत बिरज मगरची उत्तम साथ लाभली. बँकेच्या ऋषिकेश गावडे, शुभम गायकवाड, विनायक मोरे यांना उत्तरार्धात खेळ उंचावता आला नाही.

महिलांच्या अंतिम सामन्यात ठाणे मनपाने बँक ऑफ बडोदाचा ३०-२४ असा पराभव करीत “कामगार चषक” व रु. ५०,०००/- चा धनादेश बँकेत डिपॉझिट केला. या विजयाने गतवर्षी झालेल्या पराभवाची परतफेड केली. पराभूत बँकेला चषक व रु. ३५,०००/- च्या धनादेशवर समाधान मानावे लागले. पहिल्या पाचच मिनिटात मनपाने चुणूक दाखविली. ५व्या मिनिटाला बँकेवर लोण देत मनपाने ११-०८ अशी आघाडी घेतली. मध्यांतरापर्यंत ती १७-०८अशी वाढविली.

मध्यांतरानंतरच्या ४थ्या मिनिटाला व श्रद्धा पवारच्या ३ऱ्या चढाईत तिने गडी टिपले. त्यानंतर शिल्लक खेळाडूंची पकड करीत मनपाने बँकेवर दुसरा लोण देत २३-१० अशी आघाडी भक्कम केली. पण यातून नाउमेद न होता बँकेने आपले आक्रमण अधिक तेज करीत सामना संपायला ४मिनिटे शिल्लक असताना मनपाने दिलेल्या एका लोणची फेड करीत ही आघाडी २२-२९ अशी कमी करण्यात यश मिळविले. पण विजेतेपद राखण्यात त्यांना अपयश आले. कोमल देवकर, श्रद्धा पवारच्या धारदार चढाया, त्याला मेघा कदम, तेजस्वीनी पोटे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे मनपाला या विजेतेपदावर नाव कोरता आले. पूजा यादव, ऋजुता बांदिवडेकर, आरती महकंटे, साधना विश्वकर्मा यांचा चढाई-पकडीचा खेळ बँकेचा पराभव टाळण्यात कमी पडला.

ग्रामीण व्यावसायिक पुरुषांच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात जे. एस. डब्ल्यू. ने खुशबू आईस्क्रीमचा मध्यांतरातील ११-१६ अशा पिछाडीवरून ३३-३०असा पराभव करीत रु.५०,०००/ चा घनादेश व “कामगार चषक” दुसऱ्यांदा आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. उपविजेत्या खुशबू संघाला चषक व रु. ३५,०००/- च्या धनादेशावर समाधान मानावे लागले. खूषबुच्या गौरव पाटील, चेतन पाटील, सुमित शिर्के जोरदार सुरवात करीत विश्रांतीपर्यंत ५गुणांची आघाडी मिळविली होती. पण उत्तरार्धात ती त्यांना राखणे जमले नाही.

राहुल कोळी, राज पाटील, सूचित पाटील यांनी उत्तरार्धात जोरदार कमबॅक करीत विजयश्री खेचून आणली. या विभागात जे. एस. डब्ल्यू.ने अवचट इंडस्ट्रीजचा ४२-२९ असा, तर खुशबू आईस्क्रीमने इंदिरा सुत गिरणीचा ४४-२६ असा पाडाव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. शहरी व्यावसायिक पुरुषांत मुंबई बंदरने न्यू इंडियाचा ३६-२८ असा, तर सेंट्रल बँकेने बँक ऑफ बंदोडाचा २९-१६ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. महिला गटात ठाणे मनपाने एमरॉल्ड इन्फ्रास्ट्रक्चरचा ३२-१८ असा, तरबांक ऑफ बडोदाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचा ३७-२० असा पाडाव करीत अंतिम फेरी गाठली होती. या तिन्ही गटातील सहाही उपांत्य उपविजयी प्रत्येक संघाना चषक व रु.२०,०००/- चा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

व्यावसायिक शहरी विभागात स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा खेळाडू सेन्ट्रल बँकेचा ऋषिकेश गावडे, तर बँक ऑफ बडोदाचा दीपक शिंदे पकडीचा उत्कृष्ट खेळाडू ठरला. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रु. ३,०००/-चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. महिला विभागात उत्कृष्ट चढाईची खेळाडू एमरॉल्डची सिद्धी चाळके, तर उत्कृष्ट पकडीची खेळाडू बँक ऑफ बडोदाची पौर्णिमा जेधे ठरली. यांना प्रत्येकी रु. ३,०००/- चा घनादेश देऊन गौरव करण्यात आला. ग्रामीण विभागात खुशबूचा निटेश पाटील उत्कृष्ट चढाईचा, तर जे. एस. डब्ल्यू. चा सूचित पाटील पकडीचा उत्कृष्ट खेळाडू ठरला यांना प्रत्येकी रु. २,०००/- चा घनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण मा. खासदार राजेंद्र गावित, मुंबई शहर कबड्डी असो.चे अध्यक्ष आमदार भाई जगताप, उपसचिव (कामगार) डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, अर्जुन पुरस्कार सौ. माया आकरे-मेहेर, ग्लोबल हॉस्पिटलचे एच. आर. प्रमुख संजय गायकवाड, प्र. कल्याण आयुक्त महेंद्र तावडे, मनोहर इंदुलकर, रमेश हरयाणा आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.

You might also like