---Advertisement---

…आणि चौथ्या टी२० सामन्यात झळकले ‘वी मिस यू धोनी’चे पोस्टर

On: शनिवार, फेब्रुवारी 1, 2020 6:35 PM
---Advertisement---

वेलिंग्टन । काल (31 जानेवारी) स्काय स्टेडियम (Sky Stadium) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात चौथा टी20 सामना (4th T20 Match) पार पडला. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. त्याचबरोबर मालिकेत 4-0 ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यावेळी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) चाहतेही स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे दिसले.

या सामन्यात धोनी खेळत नव्हता. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांनी एका पोस्टरवर ‘वी मिस यू धोनी’ असे लिहित धोनीची आठवण काढली.

चाहत्यांनी तयार केलेल्या या पोस्टरचा फोटो बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये बीसीसीआयने (BCCI) लिहिले की, “असे फक्त चाहतेच करू शकतात.”

धोनी जरी क्रिकेटपासून सध्या दूर असला तरी त्याची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचेच या घटनेतून दिसून आले.

धोनीने जुलै 2019च्या वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने त्याला वार्षिक मानधन करारातूनही वगळले आहे. त्यामुळे धोनीच्या भविष्याबद्दल भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चा होत आहे.

धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. तो नुकताच दिल्लीमध्ये होता. त्यानंतर तो मध्यप्रदेशच्या कान्हा पार्क येथे फिरायला गेला होता.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 चा वनडे विश्वचषक जिंकला आहे. त्याने आतापर्यंत 90 कसोटी सामने, 350 वनडे सामने आणि 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 4876 धावा, वनडेत 10773 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1617 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---