भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या कारकीर्दीतील अनेक ठाम निर्णयांसाठी ओळखला जातो. धोनी त्याच्या निर्णयांबरोबरच तो त्याच्या चांगल्या वागणुकीसाठी देखील प्रसिद्ध आहे. धोनीचा असाच एक किस्सा सौरव गांगुलीशी संबंधित आहे. जिथे धोनीच्या निर्णयामुळे ‘दादा’च्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.
निरोप सामन्यात दिले होते कर्णधारपद
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 2008-09 ला कसोटी सामन्यांच्या मालिकेचा अंतिम सामना नागपूरमध्ये खेळला गेला होता. हा सामना दिग्गज फलंदाज सौरव गांगुलीच्या कारकिर्दीतला शेवटचा सामना होता. या कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघ विजयाच्या खूप जवळ पोहोचला होता. तेव्हा धोनीने गांगुलीला त्याच्या शेवटच्या सामन्यात संघांचे नेतृत्व करण्यासाठी सांगितले होते. धोनीच्या या निर्णयामुळे मैदानावर उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक भावूक झाले होते. इतकेच नव्हे तर धोनीचा या निर्णयामुळे गांगुलीला देखील आश्चर्य वाटले होते. त्यानंतर गांगुलीने या अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते.
गांगुलीने स्वतः केला खुलासा
एका मुलाखतीदरम्यान धोनीच्या या निर्णयबद्दल सौरव गांगुलीने सांगितले की, “माझ्या कारकिर्दीतला हा शेवटचा कसोटी सामना होता. या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी धोनीने मला संघाचे नेतृत्व करण्यास सांगितले होते. मला अगोदर आश्चर्यच वाटले. असे काहीतरी होईल याची मला खरंच अपेक्षा नव्हती. पण धोनी हा धोनी आहे. धोनी नेहमी आपल्या तडखाफडकी आणि योग्य निर्णय घेण्याच्या शैलीसाठी ओळखला जातो. आम्ही हा कसोटी सामना जिंकणार होतो. माझ्या डोक्यात फक्त एक गोष्ट ती म्हणजे निवृत्ती. मला नाही माहिती मी त्या 3-4 षटकांत काय केले होते.”
धोनीच्या कारकिर्दीत ‘दादा’चा होता हात
महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीला यशाच्या शिखरावर पोहचवण्यात सौरव गांगुलीची मोठी भूमिका आहे. दादांच्या नेतृत्वात धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इतकेच नव्हे तर दादाने त्याला तिसर्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली होती. दादांच्या या निर्णयानंतरच धोनीने पाकिस्तानविरुद्ध तिसर्या क्रमांकावर फलंदाजी केली होती आणि 148 धावांची उत्कृष्ट खेळी करत संघात आपले स्थान निश्चित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
एक संघ सुट्टीत तर दुसरा सरावात व्यस्त; मालिका पुढे ढकलल्यानंतर ‘धवनसेने’चा अजून जोमाने सराव सुरू
‘आयसीसी ट्रॉफी दूरच, विराटने अजून आयपीएलसुद्धा नाही जिंकली,’ माजी सहकाऱ्याचे मोठे वक्तव्य
पाकिस्तानने लढवली शक्कल, विश्वचषक आयोजनासाठी ‘या’ दोन देशांशी मिळवला हात