---Advertisement---

अश्विनच्या ‘डुप्लिकेट’ने धुडकावून लावली ऑस्ट्रेलियाची ऑफर, वर्ल्डकपमध्ये मदत करण्यास दिला नकार

On: रविवार, ऑक्टोबर 1, 2023 12:24 PM
Mahesh-Pithiya-And-R-Ashwin
---Advertisement---

जेव्हाही कोणती स्पर्धा खेळली जाणार असते, तेव्हा त्या स्पर्धेपूर्वी सहभागी संघ वेगवेगळ्या रणनीती आखतात. स्पर्धा जिथे पार पडणार आहे, त्या मैदानांची जाण असणारे, विरोधी संघाच्या गोलंदाजांप्रमाणे गोलंदाजी करणारे खेळाडूंना नेट बॉलर म्हणून आपल्या ताफ्यात सामील करत असतात. असेच काहीसे, विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी करण्याचा ऑस्ट्रेलियाने प्रयत्न केला, पण त्यांच्या या प्रयत्नावर पाणी फेरले गेले.

खरं तर, भारतीय संघाने अखेरच्या क्षणी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेपूर्वी आपल्या संघात मोठा बदल केला आहे. भारताने दुखापतग्रस्त झालेल्या अक्षर पटेल याच्या जागी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला ताफ्यात सामील केले आहे. अश्विनचे नाव ऐकताच ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंता वाढू लागतात. अशात त्यांनी विश्वचषकापूर्वी डुप्लिकेट अश्विनला नेट बॉलर म्हणून घेण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाने महेश पिथियाशी साधला संपर्क
बडोद्याचा फिरकीपटू महेश पिथिया (Mahesh Pithiya) याची गोलंदाजी ऍक्शन ही भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याच्याशी खूपच मिळती जुळती आहे. त्यामुळे त्याला अश्विनचा डुप्लिकेटही म्हटले जाते. माध्यमांतील वृत्तांनुसार, ऑस्ट्रेलियाने अश्विनच्या भारतीय संघात येताच महेश पिथिया याच्याशी करार करण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याला आपल्या कँपमध्ये नेट बॉलर म्हणून आमंत्रित केले.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1708184533399662712

मात्र, पिथिया सराव करून घरी परतत असताना, त्याला त्याच्या मित्राचा प्रीतेश जोशी याचा फोन आला. जोशी सध्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियासोबत जोडला गेला आहे. जोशीने त्याला 4 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पोहोचण्यासाठी सांगितले. मात्र, महेश पिथियाने ही ऑफर धुडकावून लावली. त्याने बडोदाकडून खेळणेच योग्य समजले.

स्पोर्ट्सस्टारशी बोलताना पिथिया म्हणाला, “ही निश्चितच एक रोमांचक ऑफर होती. मात्र, मी पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत हंगामासाठी बडोदा संघाचा भाग आहे. त्यामुळे मी याबाबत विचार केला, आमच्या प्रशिक्षकांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की, यावेळी कँपमध्ये सामील होणे माझ्यासाठी शक्य होणार नाही.”

खरं तर, या वर्षीच्या सुरुवातीला भारतात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने महेशशी करार केला होता आणि त्याला नेट बॉलर म्हणून ताफ्यात घेतले होते. मात्र, यावेळी भारतीय खेळाडूने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.

विश्वचषकाविषयी थोडक्यात
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. विश्वचषक सुरू होण्यासाठी आता फक्त 4 दिवसांचा कालावधी उरला आहे. अशात सर्व संघ भारतात आले असून सराव सामने खेळत आहेत. विश्वचषकातील भारताच्या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. (mahesh pithiya ravichandran ashwin duplicate reject australia offer net bowler ahead of world cup 2023)

हेही वाचा-
World Cupपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची केरळस्थित जगातील सर्वात श्रीमंत मंदिराला भेट, फोटो व्हायरल
‘मला वाईट वाटतंय, पण मला दुर्लक्षित…’, विश्वचषकातून ड्रॉप होण्याविषयी चहलने व्यक्त केली हळहळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---