भारतीय क्रिकेटला महान स्पिनर्सची मोठी परंपरा आहे. त्याच परंपरेतील नाव म्हणजे आपले बापू नाडकर्णी. त्यांचं खरं आणि पूर्ण नाव रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी. बापूंचे मूळ शहर नाशिक. शिक्षणासाठी बापूंनी पुण्याची गाडी पकडली. पुण्यात आल्यावर बापू किती ऑलराऊंडर होते हे समोर आले. बापू ऑलराऊंडर म्हणून इंटरनॅशनल क्रिकेट खेळले. नॅशनल लेवलला बॅडमिंटन खेळले. राज्यस्तरावर टेनिस खेळले. इंटर कॉलेज टूर्नामेंटमध्ये टेबल टेनिसही खेळले. खो-खो मध्येही सक्रिय सहभाग घ्यायचे. एवढं करूनही इंटरला गणितात 200 पैकी 200 मार्क्स त्यांनी मिळवले. एखाद्या व्यक्तीने किती ऑल राऊंडर असावा याचा हा नमुना!
बापू नाडकर्णी (Bapu Nadkarni) यांनी आपल्या क्रिकेट करिअरला लेफ्ट फास्ट बॉलर म्हणून सुरुवात केली. पुणे युनिव्हर्सिटीकडून खेळताना म्हैसूरमध्ये एका इनिंगमध्ये 7 विकेट्स घेण्याची कामगिरीही त्यांनी केली होती. मात्र, विनू मंकड यांनी त्यांना लेफ्ट आर्म स्पिनर होण्याचा सल्ला दिला. तो त्यांनी आदराने ऐकला आणि स्पिन बॉलिंग सुरू केली. त्याच्या काही वर्षे आधी प्रा. देवधर यांच्या सांगण्यावरून त्यांनी बॅडमिंटन आणि क्रिकेटपैकी क्रिकेटची निवड केलेली. त्यांनी स्पिन बॉलिंगला सुरुवात केली, तेव्हा योग्य टप्प्यासाठी तासनतास ते नाणं ठेवून बॉलिंगचा सराव करायचे. हेच त्यांच्या ऍक्युरेसीचे सिक्रेट होते.
बापू नाडकर्णी महाराष्ट्रानंतर मुंबईसाठी खेळू लागले. त्यावेळी मुंबई क्रिकेट म्हणजे टीम इंडियातील एंट्रीचे दार. त्याचा फायदा बापूंना झाला. 1955ला त्यांना न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट डेब्यू करायला मिळाला. मात्र, सातत्याने म्हणावी तशी संधी मिळत नव्हती. मिळेल त्या संधीत बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही विभागात ते आपले योगदान देत राहिले. जसा बॅटिंगमध्ये एक बॅटर नांगर टाकून खेळतो, अगदी तसंच बापू बॉलिंगमध्ये करायचे. एका बाजूने सलग बॉलिंग करत मेडनवर मेडन टाकण्यात त्यांचा हातखंडा होता. अशात आली ती 1964 ची मद्रास टेस्ट, समोर होता बलाढ्य इंग्लंड संघ.
त्या टेस्टमध्ये बापूंनी एका बाजूने सलग 21 मेडन ओव्हर (21 Maiden Overs) टाकल्या. सलग 131 बॉल मेडन टाकले गेलेले. मेडन ओव्हर मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बापूंचे त्या इनिंगमधील बॉलिंग ऍनालिसिस होते 32 ओव्हर 27 मेडन आणि 5 रन्स. विशेष म्हणजे बॅरिंग्टन आणि बोलस या त्यावेळच्या बेस्ट इंग्लिश बॅटर्सविरुद्ध त्यांनी ही बॉलिंग केलेली. ती टेस्ट आणखी संस्मरणीय बनवत त्यांनी आपल्या करिअरमधील एकमेव टेस्ट सेंच्युरीही याच टेस्टमध्ये मारली. याच काळात मुंबई डॉमेस्टिक जायंट बनली. मुंबईच्या 14 रणजी ट्रॉफी विजेतेपदात त्यांचा सहभाग होता. त्यातील बराच काळ ते कॅप्टनही होते.
सन 1968 मध्ये बापू नाडकर्णींनी टेस्ट आणि फर्स्ट क्लास क्रिकेटला अलविदा केला. 38 व्या वर्षी त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतलेला. इंटरनॅशनल क्रिकेटमधील त्यांचा इकॉनोमी रेट होता फक्त 1.67. त्यांचं फर्स्ट क्लास करिअर संपलं, तेव्हा त्यांच्या नावापुढे विकेट्स होत्या बरोबर 500. रिटायरमेंटनंतर त्यांनी सिलेक्टर आणि टीम मॅनेजर अशा दोन भूमिका पार पाडल्या. 1981च्या ऑस्ट्रेलिया टूरवर जेव्हा गावसकरांनी वॉक आऊटचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना थांबवणारे बापू नाडकर्णीच होते. ते पुढे कोचही झाले.
बापूंना अनेकदा विचारलं जायचं, “नव्या जमान्यात तुम्ही असता तर तशीच खडूस बॉलिंग केली असती का?” त्यावर त्यांचं उत्तर असायचं
“नक्कीच केली असती. या नव्या बॅटर्सनी आक्रमक रूप घेतल्यानंतर मी सुद्धा स्वतः काहीतरी बदल केला असताच ना?” आणि खरंच त्यांनी तसा बदल केला नसता, तर त्यांच्यातील तो ‘स्मार्ट ऑलराऊंडर’ कसा दिसला असता?
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जन्म अफगाणिस्तानचा, कुटुंब पाकिस्तानात वसलं, पण ‘ते’ भारतासाठी खेळले इंटरनॅशनल क्रिकेट, सिनेमातही आजमावला हात
…आणि भर कॅफेत वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांनी गल्लीतल्या पोरांसारखी केली भांडणे