शनिवारी (०७ मे) पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२मधील ५२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयाचा नायक राहिला युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल. जयस्वालने सलामीला फलंदाजीला येत आक्रमक अर्धशतकी खेळी केली आणि संघाला सामना जिंकून दिला. त्याच्या या मॅच विनिंग खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर जयस्वालने त्याच्या या प्रशंसनीय खेळीचे श्रेय जुबीन भरूचा यांना दिले आहे.
आयपीएल २०२२च्या (IPL 2022) मेगा लिलावात राजस्थान संघाने जयस्वालला (Yashasvi Jaiswal) ४ कोटींमध्ये रिटेन केले होते. परंतु तो हंगामातील सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये केवळ २५ धावाच करू शकला. परिणामी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र पंजाबविरुद्धच्या सामन्यात जवळपास एका महिन्यानंतर त्याला संधी गेली. त्याने या संधीचा फायदा घेत आपले नाणे खणखणीत वाजवले. त्याने पंजाबविरुद्ध ४१ चेंडूत ६८ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून २ षटकार आणि ९ चौकारही निघाले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हे जयस्वालचे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक होते. तसेच तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कोणत्या सामन्यात सामनावीर बनला (Yashasvi Jaiswal Man Of The Match) आहे.
या सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये बोलताना जयस्वाल म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, मला अजिबात वाटले नव्हते, मी सामनावीर बनेल. परंतु हा पुरस्कार मिळवणे अद्भुत अनुभव आहे. मी जेव्हाही फलंदाजी करायला मैदानावर जातो, तेव्हा मी पूर्ण अभिमानाने फलंदाजी करतो. मी राहुल चाहरच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या वरून खेळलेला फटका माझा आवडता फटका आहे. माझी पद्धत पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके खेळण्याची नाही. मी नेहमी मैदानावर सर्वकाही सामान्य ठेवून चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न करतो.”
जयस्वालने का दिले जुबीन यांना श्रेय
जवळपास ७ सामने बाकावर बसल्यानंतर राजस्थानसाठी केलेल्या धमाकेदार पुनरागमनाचे श्रेय जयस्वालने राजस्थान संघाचे क्रिकेट संचालक जुबीन भरूचांना (Zubin Bharucha) दिले आहे. त्यांचे आभार करताना त्याने आपला सामनावीर पुरस्कार त्यांना समर्पित केला आहे.
याबद्दल बोलताना जयस्वाल म्हणाला की, “मी माझी ही खेळी जुबीन सरांना समर्पित करतो. त्यांनी मला शानदार पुनरागमन करण्यासाठी भरपूर मदत केली आहे. मी जेव्हाही त्यांच्यासोबत बसलो किंवा जेव्हाही माझा आत्मविश्वास ढासळला, तेव्हा त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला आहे. तसेच मला पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले आहे. अशाप्रकारची खेळी खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच मी हा पुरस्कार त्यांना समर्पित करतो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एका षटकात ३० धावा देत मावीने केकेआरची डुबवली नौका, लाजिरवाणा विक्रमही केला नावे
राजस्थानच्या ‘रॉयल’ विजयानंतर मुंबईचा संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या कसे?