सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी व्यस्त असताना भारतात अनेक युवा क्रिकेटपटू निवृत्ती जाहीर करत आहेत. आठवडाभरापूर्वी निवृत्ती जाहीर केलेल्या उन्मुक्त चंद याच्यापाठोपाठ आणखी एका युवा खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारा अष्टपैलू मनन शर्मा याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत अमेरिकेसाठी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
एकोणीस वर्षाखालील संघाचा राहिला आहे सदस्य
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केलेल्या तसेच २०१० एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या ३० वर्षीय मनन शर्मा याने गुरुवारी (१९ ऑगस्ट) भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो आता अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळणार आहे. मनन यापूर्वीच कॅलिफोर्निया येथे एका स्थानिक लीगमध्ये खेळताना दिसला होता.
अमेरिकेत खेळणारा चौथा भारतीय होणार मनन
मनन शर्मा अमेरिकेत खेळणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. २०१० एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकात मननचा सहकारी राहिलेला सौरभ नेत्रवळकर हा यापूर्वीच अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. २०१२ एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद व यष्टीरक्षक स्मित पटेल यांनीदेखील यापूर्वीच भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत अमेरिकेची वाट धरली होती.
अशी राहिली होती कारकीर्द
मनन शर्मा याने प्रतिनिधित्व केलेल्या २०१० एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषक संघात केएल राहुल, मयंक अगरवाल, जयदेव उनादकट व संदीप शर्मा हे त्याचे सहकारी होते. त्याने दिल्लीसाठी आत्तापर्यंत ३५ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी व आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मननने २०१६ आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो भारतीय कर्णधार विराट कोहली व रिषभ पंत यांचा खास मित्र मानला जातो. मननचे वडील अजय शर्मा हे भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/shikhar-dhawans-place-in-indian-team-for-in-t-20-world-in-danger/






