भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी आणि वर्चस्व मिळवण्यासाठी हा सामना अत्यंत निर्णायक असणार आहे. मात्र या ऐतिहासिक मैदानावरील भारताचा विक्रम पाहता, ही लढत भारतीय संघासाठी खूप कठीण ठरणार हे निश्चित आहे.
भारताने आतापर्यंत ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे एकूण 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामने अनिर्णित राहिले, तर 4 सामने गमावावे लागले. आतापर्यंत भारताला या ऐतिहासिक मैदानावर एकही कसोटी विजय मिळालेला नाही.
भारताने 25 जुलै 1936 रोजी इंग्लंडविरुद्ध येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, संघाचे नेतृत्व महाराज विजयनगरम (विजी) करत होते. त्या सामन्यात विजय मर्चंट आणि मुश्ताक अली यांनी शतके केली होती, परंतु वॉली हॅमंडच्या 167 धावांच्या खेळीमुळे सामना अनिर्णित राहिला.
या मैदानावर भारताची सर्वात वाईट कसोटी कामगिरी 1952 मध्ये पाहायला मिळाली जेव्हा संपूर्ण संघ पहिल्या डावात फक्त 58 धावांवर बाद झाला. त्याच वेळी, 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने 432 धावांची सर्वोच्च कसोटी धावसंख्या केली होती, ज्यामध्ये मोहम्मद अझरुद्दीनने 179 धावांची शानदार खेळी खेळली. दिलीप दोशीची 6/102 (1982) ही या मैदानावर भारतीय गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे.
या मैदानावर भारताला दोनदा डावाचा पराभव सहन करावा लागला आहे. 1952 मध्ये पहिल्यांदाच टीम इंडियाला येथे लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला. पण शेवटच्या वेळी टीम इंडिया मँचेस्टरमध्ये उतरली तेव्हा पुन्हा एकदा डावाचा पराभव सहन करावा लागला. भारताने 2014 मध्ये येथे शेवटचा सामना खेळला. या सामन्यात भारताचा डाव आणि 54 धावांनी पराभव झाला.
मँचेस्टरच्या मैदानावर भारताची कामगिरी
एकूण सामने- 9
इंग्लंड जिंकले- 4
ड्रॉ- 5
भारत जिंकले- 0
भारताने आतापर्यंत ओल्ड ट्रॅफर्डवर 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी संघाने 6 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. पहिल्यांदाच भारताने 1975 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध या मैदानावर एकदिवसीय सामने खेळले होते, परंतु पहिला विजय 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मिळाला होता.






