साउथएम्पटन विरुद्ध झालेल्या लढतीत युनायटेडने ३-२ असा विजय मिळवत इएफएलचे विजेतेपद पटकावले. जोझे मोरीनोने युनायटेडचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्याच्या संघाचा पहिला महत्वाचा विजय. युनायटेड आणि लिवरपूल सध्या ४१ चषकांसह सध्या बरोबरीवर आहेत.
ही लढत सर्व बाजूने युनायटेडसाठी महत्वाची होती. झ्लातान इब्राहिमोविक आणि पॉल पोग्बा ह्यांनी जेव्हा संघाकडून खेळायला सुरवात केली तेव्हा अपेक्षांचा डोंगर समोर उभा होता, कालच्या सामन्यात विजयी गोल करत इब्राहिमोविक ने आपले महत्व सिद्ध केले. जुलै २०१६ मध्ये जेव्हा त्याचे संघात आगमन झाले तेव्हा केवळ एका मोसमाचा करार करण्यात आला होता. आता पुढे काय होते ते आपल्याला पाहावे लागेल. मोरीनो सारख्या मात्तबर संघ व्यवस्थापकाकडे जेव्हा जबाबदारी पडते तेव्हा त्याचे फळ हे निश्चित असते. डेविड मोयेस आणि लुई व्यान गाल च्या अपयशानंतर मोरीनोच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले होते.
एकंदरीत मँचेस्टर युनायटेडच्या विजयी मालिकेची ही सुरवात आहे असे म्हणता येईल.