fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वनडे मालिका सुरु होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का

भारतीय महिला संघाची आजपासून(9 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका महिला संघाबरोबर 3 सामन्यांची वनडे मालिका बडोदा येथे सुरु झाली आहे. पण ही मालिका सुरु होण्याआधीच भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला होता. त्यांची स्टार फलंदाज स्म्रीती मंधना दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडली आहे.

तिला या वनडे मालिकेआधी सराव सत्रादरम्यान पायाच्या अंगठ्याची दुखापत झाली आहे. तिच्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याने तिला या वनडे मालिकेला मुकावे लागणार आहे. तिच्याऐवजी भारतीय महिला संघात 20 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू पुजा वस्त्राकारचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

मंधनाच्या या दुखापतीमुळे 1 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या भारतीय महिला संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यात तिच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या दौऱ्यात भारतीय महिला वेस्ट इंडीज महिला संघाविरुद्ध 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळणार आहेत.

आजपासून सुरु झालेल्या दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी अंतिम 11 जणांच्या भारतीय महिला संघात मंधना ऐवजी प्रिया पुनियाला संधी मिळाली आहे. पुनियाने या वनडे सामन्यातून वनडे पदार्पण केले आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like