Loading...

तब्बल ३० चौकार ठोकत या भारतीय क्रिकेटपटूने केले त्रिशतक पूर्ण

भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 6 व्या फेरीत बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना बंगालकडून मनोज तिवारीने आज(20 जानेवारी) त्रिशतकी खेळी केली आहे.

या सामन्यात बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण बंगालने ईश्वरन(12) आणि अभिषेक रमण(0) यांच्या विकेट लवकर गमावल्या. त्यामुळे 6 व्याच षटकात मैदानात आलेल्या मनोज तिवारीने संघाची धूरा हाती घेतली.

त्याने सुरुवातीला अनुस्तुप मुजुमदार(59) बरोबर चौथ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. नंतर श्रीवत्स गोस्वामीला साथीला घेत त्याने 5 व्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी रचली. गोस्वामी 95 धावांवर बाद झाला. त्याचे शतक केवळ 5 धावांनी हुकले. यानंतरही शाहबाज अहमद(49) आणि अर्णव नंदी(65) यांनी तिवारीला चांगली साथ दिली.

तिवारीने 414 चेंडूंचा सामना करताना 30 चौकार आणि 5 षटकारांसह 73.19 च्या स्ट्राईक रेटने 303 धावा केल्या. तिवारीचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले त्रिशतक आहे. त्याचे त्रिशतक पूर्ण होताच बंगालने त्यांचा पहिला डाव 7 बाद 335 धावांवर घोषित केला.

विशेष म्हणजे काल(19 जानेवारी) या सामन्याच्या पहिल्या दिवशी तिवारीने शतक केल्यानंतर एक खास ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने त्याच्या बॅटचा आणि त्याच्या मुलाचा फोटो शेअर केला होता. तसेच ट्विटमध्ये त्याने माहिती दिली होती की त्याने वापरलेल्या बॅटवर त्याच्या मुलाचे नाव कोरलेले होते. त्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास होते.

Loading...

तिवारीने 2008मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 2015 पर्यंत 12 वनडे सामने खेळले तर 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत 287 धावा आणि टी20मध्ये 15 धावा केल्या.

Loading...

सध्या बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर हैद्राबादने पहिल्या डावात 5 बाद 83 धावा केल्या आहेत. बंगालकडून आकाश दीपने 3 विकेट्स आणि मुकेश कुमारने 2 विकेट्स घेतल्या.

You might also like
Loading...