ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे. त्यामुळे उर्वरित कसोटी मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेवर आहे. त्यामुळे भारताचे कसोटीत नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या कर्णधारांमध्ये त्याचाही समावेश झाला आहे.
विराटने घेतली पालकत्व रजा –
विराटची पत्नी आणि बॉलिवुड अभेनेत्री अनुष्का शर्मा सध्या गर्भवती असून ती त्यांच्या पहिल्या अपत्याला जानेवारी २०२१ मध्ये जन्म देणार आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर पालकत्व रजा घेतली असून तो भारतात परतला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेवर आली आहे.
आत्तापर्यंत या मराठी खेळाडूंनी केले आहे भारताचे कसोटीत नेतृत्व
भारतीय क्रिकेट संघाला महाराष्ट्राने आत्तापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार दिले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताला आत्तापर्यंत ३३ कसोटी कर्णधार लाभले आहेत. त्यातील तब्बल १२ कर्णधार महाराष्ट्रातील आहेत, म्हणजेच महाराष्ट्रात जन्म झालेले किंवा महाराष्ट्र व मुंबई संघाकडून खेळले आहेत. यात सीके नायडू, विजय हजारे, विनू मंकड, पॉली उम्रीगर, हेमू अधिकारी, चंदू बोर्डे, अजित वाडेकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवि शास्त्री, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघाला लाभलेले पहिले कसोटी कर्णधार सीके नायडू यांचा जन्मही महाराष्ट्रातील नागपूरचा आहे. तसेच मंकड यांचा जन्म जरी गुजरातचा असला तरी ते देशांतर्गत क्रिकेट गुजरात व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि मुंबईकडूनही खेळले आहेत.
महाराष्ट्रात जन्म झालेल्या क्रिकेटपटूंपैकी गावसकरांनी सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यांनी ४७ सामन्यात भारताचे कर्णधारपद सांभाळले. त्यांच्या पोठापाठ सचिन तेंडुलकर असून त्याने २५ सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.
या सर्वांमध्ये रहाणे हा आत्तापर्यंतचा शेवटचा मराठी कर्णधार आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर होता.
रहाणेचा कर्णधार म्हणून अनुभव –
रहाणेने आत्तापर्यंत ७ आंततराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात २ कसोटी, ३ वनडे आणि २ टी२० सामन्यांचा समावेश आहे. त्याने नेतृत्व केलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात आणि तिन्ही वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. मात्र त्याने नेतृत्व केलेल्या २ टी२० सामन्यांपैकी १ भारताने जिंकला आहे, तर १ सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे.
महाराष्ट्रात जन्म झालेले किंवा महाराष्ट्र व मुंबईकडून खेळलेल्या खेळाडूंपैकी भारतीय कसोटी संघाचे कर्णधार झालेले खेळाडू व कर्णधार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी खालील प्रमाणे –
सीके नायडू – (४ सामने – ३ पराभव, १ अनिर्णीत)
विजय हजारे – (१४ सामने – १ विजय, ५ पराभव, ८ अनिर्णीत)
विनू मंकड – (६ सामने – १ पराभव, ५ अनिर्णीत)
पॉली उम्रीगर – (८ सामने – २ विजय, २ पराभव, ४ अनिर्णीत)
हेमू अधिकारी – (१ सामना – १ अनिर्णीत)
चंदू बोर्डे – (१ सामना – १ पराभव)
अजित वाडेकर – (१६ सामने – ४ विजय, ४ पराभव, ८ अनिर्णीत)
सुनील गावसकर – (४७ सामने – ९ विजय, ८ पराभव, ३० अनिर्णीत)
दिलीप वेंगसरकर – (१० सामने – २ विजय, ५ पराभव, ३ अनिर्णीत)
रवी शास्त्री – (१ सामना – १ विजय)
सचिन तेंडुलकर (२५ सामने – ४ विजय, ९ पराभव, १२ अनिर्णीत)
अजिंक्य रहाणे (२ सामने – २ विजय)
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी काय करू मग? सोडून टाकू सगळं?’, केएल राहुलला दुसऱ्या कसोटीत संधी न दिल्याने मिम्स व्हायरल
स्मिथची प्रतिक्षा आणखी वाढली! ऑस्ट्रेलियात असून ‘एवढे’ महिने भेटला नाही पत्नीला
बीसीसीआयच्या बैठकीमध्ये घेतले गेले ‘हे’ प्रमुख १० निर्णय, वाचा पूर्ण माहिती
ट्रेंडिंग लेख –
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम