वेस्ट इंडिजला दोन टी२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेस्ट इंडिजचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मार्लेन सॅम्युअल्स निवृत्तीनंतरही वादात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अमिराती क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) वतीने त्याच्यावर चार आयसीसी भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपी ठेवले आहेत. आयसीसीने अधिकृतरित्या याबाबत माहिती कळवली.
या चार नियमांबाबत लावले गेले आरोप
आयसीसी व ईसीबीने संयुक्तरीत्या सॅम्युअल्सवर चार आरोप लावले आहेत. अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या टी१० स्पर्धेत त्याने हे नियम मोडल्याचे सांगितले गेले. सॅम्युअल्सवर २.४.२, २.४.३, २.४.६ व २.४.७ या आयसीसीच्या चार नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सॅम्युअल्सला आपल्यावरील आरोपांच्या विरोधात दाद मागण्यासाठी १४ दिवसांचा अवधी दिला गेला आहे. हा अवधी २१ सप्टेंबरपासून सुरू होईल. याव्यतिरिक्त आयसीसीने अधिक माहिती दिली नाही.
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत राहिले वादांशी नाते
मार्लेन सॅम्युअल्स हा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक वेळा वादांमध्ये राहिला होता. त्याच्यावर मॅच फिक्सिंग प्रकरणात आरोप लावले गेले होते. तसेच, मैदानावर खेळाडूंवर हात उगारणे तसेच शिवीगाळ करणे अशा घटना त्याच्या कारकीर्दीत वारंवार घडल्या होत्या. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याच्यासोबत त्याचा वाद फारच गाजलेला.
शानदार राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मार्लेन सॅम्युअल्स याचा वेस्ट इंडीजने जिंकलेल्या २०१२ व २०१६ टी२० विश्वचषक संघात सहभाग होता. त्याने या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करत वेस्ट इंडिजला विजयी केलेले. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून १२ हजारपेक्षा जास्त धावा काढल्या. तसेच, १५२ आंतरराष्ट्रीय बळी देखील त्याच्या नावे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एका सोशल मीडिया पोस्टमुळे पंजाबचा ‘हा’ खेळाडू आला गोत्यात; लवकरच होणार चौकशी
‘टी२०त चौकार-षटकार नव्हे अठकारही असावा, सुरुवात आयपीएलपासून व्हावी’, दिग्गजाचा अनोखा प्रस्ताव
सीएसकेच्या खेळाडूंनी दिलेल्या सन्मानाने भारावला ऋतुराज, हॉटेल स्टाफकडूनही जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ






