सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे टी२० विश्वचषकातील सुपर १२ फेरीचे सामने खेळले जात आहेत. ब गटामध्ये समावेश असलेल्या भारतीय संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्याच बरोबर विजेतेपदाचे दावेदार म्हणून स्पर्धेत उतरलेला न्यूझीलंड संघ देखील आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झाला. दोन्ही संघांना पाकिस्तानने मात दिली. स्पर्धेतील आपले आव्हान टिकवण्यासाठी या दोन्ही संघांना आता आपले उर्वरित सामने जिंकावे लागतील. त्याच वेळी आता रविवारी (३१ ऑक्टोबर) हेच दोन्ही संघ दुबई येथे आमने-सामने येणार आहेत. मात्र, या सामन्याआधी भारतीय संघासाठी काहीशी आनंदाची बातमी समोर येत आहे.
हा खेळाडू मुकू शकतो भारताविरुद्धच्या सामन्यात
न्यूझीलंड संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज व आक्रमक सलामीवीर मार्टिन गप्टिल भारताविरुद्धच्या सामन्याला मुकू शकतो. मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याचा यॉर्कर चेंडू त्याच्या घोट्यावर आदळला होता. त्याने त्यावेळी फलंदाजी केली. मात्र, क्षेत्ररक्षण करत असताना त्याला त्रास जाणवू लागल्याने तो मैदानाबाहेर गेला होता.
न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी त्याच्या दुखापतीविषयी बोलताना म्हटले,
“सामना संपल्यानंतर त्याला काहीसे अस्वस्थ वाटत होते. सध्या त्याला २४ ते ४८ तासांची विश्रांती घेण्यास सांगितले गेले आहे. आम्ही त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून असून पुढील वृत्त लवकरच कळविण्यात येईल.”
गप्टीलने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात १७ धावांचे योगदान दिले होते.
न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे गप्टिल
मार्टिन गप्टिल हा आकडेवारीचा विचार केल्यास न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी टी२० फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत न्यूझीलंडसाठी २९५६ धावा बनविल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३६ पेक्षा अधिक राहिला आहे. तो भारताविरुद्धच्या सामन्यातून अथवा स्पर्धेतून बाहेर झाल्यास हा न्यूझीलंड संघासाठी दुसरा धक्का असेल. यापूर्वी प्रमुख वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.