क्रिकेट या खेळातील काही सर्वसाधारण नियम प्रत्येक क्रिकेटरसिकाला परिचित असतात. जसे की, टी२० क्रिकेटमध्ये २० षटके असणे, नो बॉल टाकल्यास फ्री हिट मिळणे, फलंदाजाची बॅट किंवा पाय यष्टीला लागल्यास हिट विकेट होणे. अगदी याप्रमाणेच एका षटकात ६ चेंडू टाकणे आणि तेही एकाच गोलंदाजाने टाकणे, हा साधा व सरळ नियम आहे. एखाद्या वेळी षटक फेकताना गोलंदाज दुखापती झाला तर त्याच्याऐवजी दुसरा गोलंदाज ते षटक पूर्ण करतो, असेही पाहायला मिळते.
परंतु एका षटकातील ६ चेंडू टाकण्यासाठी एक नव्हे दोन नव्हे चक्क तीन गोलंदाजांनी गोलंदाजी केली असल्याचे ऐकून जरा विचित्रच वाटते. मात्र असे वास्तवात घडले आहे. या ऐतिहासिक आणि एकमेव षटकाची सुरुवात ज्या गोलंदाजाने केली होती, त्या गोलंदाजाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्या षटकाची रोमांचक कहाणी.
वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मार्वन डिल्लन. कर्टनी वॉल्श आणि कर्टली एम्ब्रोस अशा महान गोलंदाजांचा वारसा पुढे नेणारे डिल्लन यांचा जन्म ५ जून १९७४ रोजी त्रिनिदाद येथे झाला होता. याच डिल्लन यांनी ते ऐतिहासिक षटक फेकण्याची सुरुवात केली होती. श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात २१ ते २५ नोव्हेंबर २००१ दरम्यान कँडी येथे दुसरा कसोटी सामना झाला होता. या सामन्यात गोलंदाजी करताना ही घटना घडली होती.
डिल्लन हे गोलंदाजी करण्यासाठी आले होते. परंतु त्यांच्या पोटात दुखू लागल्याने षटक अर्धे सोडूनच ते पव्हेलियनला परतले. त्यांनी षटकातील सुरुवातीचे दोनच चेंडू टाकले होते. त्यांच्यानंतर संघ सहकारी कॉलिन स्टुअर्ट यांच्याकडे पुढील षटक सोपवण्यात आले होते. त्यांनी षटकातील तिसरा चेंडू तर व्यवस्थित टाकला. परंतु पुढील २ चेंडू अतिशय उंचीवरुन आणि फुलटॉस टाकले. त्यामुळे पंचांनी त्यांना गोलंदाजी करण्यापासून थांबवले आणि त्या दोन्ही चेंडूंना नो बॉल करार केले. पुढे त्यांना पूर्ण डावातही गोलंदाजी करण्याची परवानगी दिली गेली नाही.
अखेर कॉलिननंतर ख्रिस गेलकडे गोलंदाजी देण्यात आली. त्याने षटकातील उर्वरित चेंडू व्यवस्थितपणे टाकले. अशाप्रकारे डिल्लन, कॉलिन आणि गेल या ३ गोलंदाजांनी मिळून ते षटक पूर्ण केले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा एकमेव प्रसंग आहे, ज्यामध्ये तिघांनी मिळून एक षटक पूर्ण केले होते.
डिल्लन गोलंदाजीमध्ये जितके पारंगत होते तितकीच वाईट त्यांची फलंदाजी होती. तसे तर त्यांनी ३८ कसोटी सामने खेळताना ५४९ धावा केल्या होत्या. परंतु त्यांची फलंदाजी सरासरी केवळ ८.४४ इतकी होती. याखेरीज एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही त्यांच्या नावे जमा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कौतुक करा कौतुक! क्रिकेटला मिळाला दुसरा युवराज, पठ्ठ्याने टी१० लीगच्या एका ओव्हरमध्ये ठोकले ६ षटकार
खासदार असूनही आयपीएलमध्ये काम का करतो? बोलणाऱ्यांना गंभीरची चपराक; म्हणाला, ‘मला कसलीही लाज नाही…’