29 वर्षांची विनेश. रात्रभर जागी राहिली. सायकलिंग, जॉगिंग केलं. दोरीवर उड्या मारल्या. काहीही न खाता-पिता ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होती. सकाळ झाली तेव्हा ती वेदनेनं ओरडत होती. अखेर वजन मोजण्यात आलं. वजन कमी झालं होतं, मात्र ते आवश्यकतेपेक्षा 100 ग्रॅम जास्तच भरलं. परिणामी विनेश पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलसाठी अपात्र ठरली. यानंतर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक आणेल, अशी सर्वांना अपेक्षा होती.
विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अशाप्रकारे बाहेर पडल्यानंतर अनेकांना मेरी कोमची घटना आठवत आहे. भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोमला देखील अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं, ज्यानंतर तिनं अवघ्या चार तासांत आपलं वजन दोन किलोनं कमी केलं होतं!
ही घटना 15 सप्टेंबर 2018 ची आहे. पोलंडमध्ये सिलेशियन ओपन बॉक्सिंग स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत पाच वेळची विश्वविजेती मेरी कोम देखील सहभागी होणार होती. मेरी कोम 48 किलो वजनी गटात उतरली होती. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी तिचं वजन 50 किलोपर्यंत पोहोचलं होतं. एकदा असं वाटलं होतं की मेरी कोम स्पर्धेसाठी अपात्र ठरेल, पण तसं झालं नाही. मेरी कोमनं अवघ्या चार तासांत तिचं दोन किलो वजन कमी केलं होतं. यासाठी तिनं तासभर सतत दोरीवरच्या उड्या मारल्या होत्या!
त्या घटनेबाबत मेरी कोमनं सांगितलं की, “आमची फ्लाइट पोलंडमध्ये पहाटे 3.30 च्या सुमारास उतरली. माझं वजन सुमारे 2 किलो जास्त होतं. सकाळी 7.30 वाजता वजन मोजल्या जाणार होतं. त्यामुळे माझ्याकडे फक्त चार तास होते. जर मी वजन कमी करू शकले नसते, तर मला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं असतं.
मेरी कोमनं तिच्या वजन कमी करण्याच्या पद्धतीबद्दल सांगितलं होतं की, तिनं एक तास दोरीवरच्या उड्या मारल्या आणि स्ट्रेचिंग केलं. त्या मॅचमध्ये मेरी कोमनं केवळ वजन कमी करून भागच घेतला नाही, तर कझाकिस्तानच्या आयझेरिमचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदकही जिंकलं.
परंतु कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलपूर्वी हे करता आलं नाही. रात्रभर प्रयत्न करूनही तिचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त राहिलं. विनेशच्या स्पर्धेचा हा पहिला दिवस असता तर कदाचित ती काही तरी करू शकली असती. कारण कोणत्याही कुस्तीपटूला पहिल्या दिवशी वजन मोजण्यासाठी 30 मिनिटं दिली जातात. या काळात ते स्वतःचं वजन अनेक वेळा घेऊ शकतात. मात्र दुसऱ्या दिवशी वजनासाठी केवळ 15 मिनिटंच उपलब्ध असतात.
हेही वाचा –
काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलंच
विनेश ऑलिम्पिकमधून बाहेर, आता ही कुस्तीपटू खेळणार अंतिम सामना; पराभवानंतरही लागली लॉटरी
2 कुस्तीपटू आणि 2 मोठे वाद; विनेश फोगट आणि निशा दहिया यांच्याकडून पदक हिसकावले?