---Advertisement---

सॅमसनने घेतला सुपर झेल! मास्टर ब्लास्टरलाही आठवले जूने दिवस

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 10:20 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये बुधवारी ( 30 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला 37 धावांनी पराभूत करून या हंगामातील दुसरा विजय मिळवला. सलग दोन सामने जिंकल्यानंतर राजस्थानला पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.

असे असले तरी राजस्थानचा फलंदाज संजू सॅमसनने या सामन्यात एक उत्तम झेल घेतला. हा झेल पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचे कौतुक केले आहे. हा झेल पाहून सचिनला त्याचे जुने दिवस आठवले.

झाले असे की प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स फलंदाजी करत असताना त्याने १८ व्या षटकात एक फटका मारला. त्यावेळी डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या सॅमसनने उडी मारली आणि एक शानदार झेल घेतला. झेल घेतल्यानंतर त्याचे संतुलन बिघडले आणि तो खाली पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याला थोडा मार लागला.

सॅमसनने घेतलेला हा झेल पाहून सचिनला त्याच्या खेळाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण आली. 1992 च्या विश्वचषकात सचिननेही जवळपास असाच झेल घेतला होता. 1992 मध्ये वेल्लिंग्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध सीमारेषेवर एक झेल घेतल्याचे सचिनला आठवले. सचिनने भारतीय गोलंदाज मनोज प्रभाकर यांच्या चेंडूवर फिल सिमन्सला झेलबाद केले होते. पण वेस्ट इंडीजने हा सामना पाच गड्यांनी जिंकला होता.

सचिनने ट्वीट केले की, “संजू सॅमसनने शानदार झेल घेतला. मला माहित आहे की जेव्हा आपण जमिनीवर पडतो आणि डोक्याला लागते तर खूप वेदना होते. 1992 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान जेव्हा वेस्ट इंडिजविरुद्ध झेल घेतला होता तेव्हादेखील मला त्रास झाला होता.”

एका ट्विटरकर्त्याने सचिनच्या आणि सॅमसनच्या झेलांचा व्हिडिओही शेअर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सचिनने म्हटले आहे की ‘हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.’

बुधवारी झालेल्या सामन्यात संजू सॅमसनने मात्र चांगली फलंदाजी केली नाही. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात अर्धशतक ठोकणारा सॅमसन या सामन्यात 8 धावांवर बाद झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---