भारताच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने देशाची मान अभिमानाने उंचावेल असं काम करून दाखवलं. रविवारी (दि. 29 जानेवारी) सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 7 विकेट्सने धूळ चारली. या विजयासोबत भारताने पहिल्या-वहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक स्पर्धेचा किताबही पटकावला. यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून विजेत्या संघाच्या खेळाडूंचा सत्कार समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. हा समारंभ बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी20 सामन्याआधी होईल. विशेष म्हणजे, खेळाडूंचा सत्कार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते होईल.
सचिव जय शाहांचे ट्वीट
याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी केली आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देत लिहिले की, “आम्हाला हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे पदाधिकारी विजयी भारताच्या 19 वर्षांखालील संघाला 1 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सायंकाळी 6.30वाजता सन्मानित करेल. युवा खेळाडूंनी भारताला अभिमान वाटेल असं काम केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कामगिरीसाठी त्यांचा सन्मान करणार आहोत.”
तब्बल 5 कोटींची घोषणा
विशेष म्हणजे, जय शाहांनी भारतीय महिला संघाने रविवारी विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयकडून संपूर्ण संघासाठी 5 कोटी रुपये रोख बक्षीस रकमेची घोषणाही करण्यात आली होती. शाहांनी ट्वीट केले होते की, “भारतीय महिला संघ सध्या शिखरावर आहे. तसेच, विश्वचषक जिंकून महिला क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे. बक्षीस म्हणून संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी 5 कोटी रुपयांची घोषणा करताना मला खूपच आनंद होत आहे.”
विक्रमवीर सचिन
जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावाचाही समावेश होतो. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत विक्रमी 100 शतके झळकावली आहेत. यादरम्यान सचिनने कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतके ठोकली आहेत. तो 2011 सालच्या वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.
अंतिम सामन्याचा आढावा
अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 (U19 Womens T20 World Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड महिला (England Women) संघाचा डाव 17.1 षटकात 68 धावांवर संपुष्टात आला होता. हे आव्हान भारतीय महिला (India Women) संघाने 14 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केले. यामध्ये सौम्या तिवारी आणि गोंगाडी त्रिशा यांनी प्रत्येकी 24 धावांचे मोलाचे योगदान दिले. कर्णधार शफाली वर्मा (Shafali Verma) हिने 15 धावा कुटल्या. तसेच, भारताच्या ज्युनिअर किंवा सीनियर महिला संघाने पहिल्यांदा विश्वचषक किताब आपल्या नावावर केला आहे. (master blaster sachin tendulkar felicitate team india women u19 cricketers jay shah ahmedabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता नाही तर कधी?’, सरफराजला डावलले जात असल्यामुळे पाकिस्तानी दिग्गजही नाराज
‘हे पाहून डी कॉक आयपीएल खेळणार नाही…’, भारत-न्यूझीलंड सामन्यांतर गंभीरची प्रतिक्रिया चर्चेत





