आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला आतापर्यंत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला १० गडी राखून पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीत पोहचणे देखील कठीण झाले आहे. भारतीय संघाचा पुढील सामना येत्या ३ नोव्हेंबर रोजी अफगानिस्तान संघासोबत होणार आहे. या सामन्यात जर भारतीय संघाला विजय मिळवायचा असेल तर, त्यांना अफगानिस्तानच्या फिरकी गोलंदाजांपासून सावध राहावे लागणार आहे.
राशिद खान
टी-२० क्रिकेटमध्ये राशिद खानसमोर भलेभले दिग्गज खेळाडू अडचणीत येत असतात. नुकताच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील कामगिरी पाहता तो भारतीय फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो.
मुजीब उर रहमान
राशिद खानला जर मुजीब उर रहमानची साथ मिळाली तर हे दोघे मिळून भारतीय संघाचा फलंदाजी क्रम उध्वस्त करू शकतात. मुजीब उर रहमान आपल्या गुगली चेंडूने भल्याभल्या फलंदाजांना अडचणीत टाकत असतो. तसेच स्कॉटलॅंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ५ गडी बाद केले होते.
काय असेल भारतीय संघाचा मास्टरप्लॅन?
भारतीय फलंदाज हे फिरकी गोलंदाजांना जितकं चांगल खेळतात तितकं इतर कुठल्याही देशातील फलंदाज खेळत नाही. परंतु आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत उलट चित्र पाहायला मिळाले आहे. पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात फिरकीपटू शादाब खानने भारतीय फलंदाजांच्या चिंतेत वाढ केली होती. तर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ईश सोढीने भारतीय फलंदाजी क्रम उध्वस्त केला होता.
या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांवर सुरूवातीपासूनच आक्रमण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद होऊन परतले. त्यामुळे अफगानिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी थोडा वेळ घेऊन चेंडू समजून मग त्यांच्यावर आक्रमण केले पाहिजे.
जर भारतीय संघाला उपांत्यफेरीत प्रवेश करायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीत अफगानिस्तान संघाला मोठ्या अंतराने पराभूत करावे लागेल. ज्यामुळे भारतीय संघाचा रनरेट वाढेल. तसेच इतर संघाच्या कामगिरीवर देखील भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशचा खेळ खल्लास करण्यासाठी उतरणार दक्षिण आफ्रिका, सेमीफायनलसाठी ठोकणार दावेदारी!
‘या’ ३ अनफिट खेळाडूंवर विश्वास दाखवून निवडकर्त्यांनी केली चूक? टी२० विश्वचषकात ठरतायत फेल