---Advertisement---

इंग्लंडच्या नव्या संघाने पाकिस्तानला चारली धूळ, पहिल्या वनडेत पाहुण्यांचा ९ विकेट्सने दारुण पराभव

On: शुक्रवार, जुलै 9, 2021 9:00 AM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. गुरुवारी (०८ जुलै) सोफिया गार्डन, कार्डिफ येथे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना पार पडला. ५ नवख्या खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या यजमान संघाने ९ विकेट्सने पाहुण्या संघाला चितपट केले आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. यानंतर मालिकेतील दुसरा वनडे सामना शनिवारी (१० जुलै) होणार आहे.

इंग्लंड वनडे संघाचा नवनियुक्त कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. इंग्लंडचा गोलंदाज शाकिब महसूदने सामन्यातील पहिलेच षटक टाकताना पाकिस्तानला दणक्यावर दणके दिले. सलामीवीर इमाम-उल-हक आणि कर्णधार बाबर आझम यांना त्याने शून्यावर माघारी धाडले. यानंतर पाकिस्तानचा संघ सामन्यात पुनरागमन करण्यासाठी झगडताना दिसला.

एका बाजूने विकेट्स जात असताना सलामीवीर फखर जमान याने ४७ धावांची चिवट झुंज दिली. ६७ चेंडूंचा सामना करताना ६ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. त्याचबरोबर शादाब खानने ३० धावांचे योगदान दिले. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे इतर क्रिकेटपटूंसह जमान आणि शादाब या दोघांचाही टिकाव लागला नाही आणि अवघ्या ३५.५ षटकात १४१ धावांवर पाकिस्तानचा पूर्ण संघ बाद झाला.

इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज शाकिब महमूदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर क्रेग ओवरटन आणि मॅथ्यू पार्किसन यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले.

पाकिस्तानचा १४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पावरप्लेमध्येच इंग्लंडला पहिला धक्का बसला. शाहीन आफ्रिदीने इंग्लंडचा सलामीवीर फिलिप साल्टला ७ धावांवर झेलबाद केले. परंतु डेविड मलान आणि झॅक क्राउले यांनी दमदार शतकी भागिदारी करत २१.५ षटकातच विजय फत्ते केला. मलानने ६९ चेंडूंमध्ये नाबाद ६८ धावा केल्या. तर क्राउलेने ५० चेंडूंमध्ये नाबाद ५८ धावा जोडल्या.

अप्रतिम गोलंदाजीसह पाकिस्तानी फलंदाजांना लोटांगण घालण्यास भाग पाडणाऱ्या शाकिब महमूदला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

संजू सॅमसन नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षकाने श्रीलंकाविरुद्ध करावे यष्टीरक्षण, माजी खेळाडूची इच्छा

आयसीसीने धोनीसाठी शेअर केलेल्या व्हिडिओवर संगकाराने ‘ही’ प्रतिक्रिया देऊन जिंकले चाहत्यांचे मन

श्रीलंका-भारत मालिकेवर संकट; यजमानांच्या संघातील ‘हा’ महत्त्वाचा सदस्य आढळला कोरोना पॉझिटिव्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---