२००० चे दशक हा असा काळ होता, जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने त्या काळी जगातील सर्वात मोठी कसोटी खेळी केली होती. तो काळ म्हणजेच २००३ होय. १० ऑक्टोबर २००३मध्ये पर्थ येथे झिंबाब्वेविरुद्ध हेडनने तब्बल ३८० धावा ठोकल्या होत्या. त्याच खेळीच्या आठवणींना उजाळा देत हेडनने मोठा आणि गजब खुलासा केला आहे. हेडनने सांगितले की, त्यानी ती खेळी दुखापतग्रस्त झाल्यामुळे खेळली होती.
फिजिओशी झाला होता शाब्दिक वाद
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज हेडनने आपल्या त्या खेळीच्या आठवणी ताज्या करत सांगितले की, कशाप्रकारे त्याने त्यावेळी ३८० धावांची कसोटी इतिहासातील सर्वोच्च खेळी केली होती. त्याने त्या सामन्यात ब्रायन लाराच्या ३७५ धावांचा विक्रम मोडला होता.
द ग्रेड क्रिकेटर पॉडकास्टशी बोलताना हेडनने म्हटले, “कदाचित मी खूपच भाग्यवान होतो की, मी त्या सामन्यात खेळत होतो. सामन्यापूर्वी माझ्या पाठीला खूप त्रास होत होता. त्यावेळी फिजिओ, ऍरॉल वॉलकॉट यांनी मला म्हटले, ‘मित्रा, तू खेळू शकत नाही.’ आणि मी म्हटले, मला नाही वाटत ऍरॉल. माझं काम तुम्हाला हे सांगणं आहे की मी खेळू शकतो. आणि तुमचे काम मला मैदानात ठेवणे आहे.”
दुखापत झाल्यामुळे बनविले होते ३८० चा विश्वविक्रम
कसोटी क्रिकेट इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हेडनचा दुसरा क्रमांक लागतो. हेडन नेहमीच आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. त्या सामन्याबद्दल बोलताना त्याने पुढे सांगितले की, कशाप्रकारे त्या दुखापतीने त्याला आक्रमक खेळी करण्याचा पर्याय निवडण्यासाठी प्रवृत्त केले. कारण तो धावू शकत नव्हता. त्या सामन्यात त्याने केवळ ४३७ चेंडूत ३८० धावांची खेळी केली होती.
हेडन पुढे म्हणाला, “कसोटीत मला ज्याप्रकारे फलंदाजी करायची होती, त्याप्रकारे फलंदाजी मी केली. कारण मला खाली वाकणे शक्य नव्हते. त्यामुळे धावण्याऐवजी मी विचार केला की, सर्वात योग्य उपाय म्हणजे हवेत शॉट खेळून धावा करणे आहे. त्या सामन्यात माझ्या बॅटवर चेंडू खूप चांगल्याप्रकारे येत होते. मी चेंडूच्या रेषेच्या बाहेर जाऊन खेळत होतो, जे कदाचित फटकेबाजीचे तंत्र बनले होते आणि तेच माझ्यासाठी फायद्याचे ठरले.”
मॅथ्यू हेडनने खेळली होती कसोटीतील सर्वात मोठी खेळी
त्या सामन्यात हेडनने ३८० धावा करत लाराचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला होता. लाराने इंग्लंडविरुद्ध १९९४ साली ३७५ धावा ठोकल्या होत्या. हेडनने ही सर्वोच्च खेळी केल्यानंतर त्याला एका खेळाडूचा फोन आला होता, तो खळाडू इतर कोणीही नसून ब्रायन लारा होता. लाराने पुढील ६ महिन्यांच्या आतच १० एप्रिल २००४ रोजी सुरु झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्धच नाबाद ४०० धावांची खेळी करत कसोटीत सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम पुन्हा आपल्या नावावर केला. लाराने केलेल्या ४०० धावांची खेळी ही कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
सामन्यानंतर एका मुलाखतीत हेडनने म्हटले होते की, “ही खेळी माझ्या कारकिर्दीतील सर्वात चांगली खेळी आहे. कारण या ११ तासांमध्ये मी प्रत्येक शॉट सहजतेने खेळला आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-विलियम्सनला खास बर्थडे गिफ्ट देत ‘या’ खेळाडूने केली भारतीय चाहत्याची बोलती बंद
-आयपीएल २०२०: यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात हे ३ परदेशी खेळाडू…
-टी२० विश्वचषक जिंकवलेले मात्र आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले ५ क्रिकेटपटू
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेट जगतातील हे दिग्गज ५ खेळाडू, ज्यांना हासताना चाहत्यांनी फारच क्वचित पाहिले
-केवळ १ टी२० सामना खेळणारे ३ दिग्गज भारतीय खेळाडू