क्रिकेट हा एक असा खेळ आहे जिथे एक चांगली खेळी कोणाची तरी कारकीर्द घडवते, तर एक खराब खेळी कारकीर्द संपुष्टात देखील आणू शकते. असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना त्यांच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळालं. परंतु चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांना संघातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरा व्यवसाय सुरू केला. असे खूप कमी वेळेस घडले आहे की, एकदा व्यवसाय सुरू केल्यानंतर तो क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करेल. परंतु ऑस्ट्रेलियाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडच्या बाबतीत असे घडले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मॅथ्यू वेडने मोलाचे योगदान दिले आहे. ज्यावेळी ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत होता. त्यावेळी मॅथ्यू वेडने शेवटी येऊन तुफानी खेळी केली आणि ऑस्ट्रेलिया संघाला जोरदार विजय मिळवून दिला. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मॅथ्यू वेडला संघात स्थान देण्याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. परंतु त्याने ज्या परिस्थितीत पुनरागमन केले आहे, ते अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहे.
ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आल्यानंतर मॅथ्यू वेड निराश झाला होता आणि त्याने नशिबाला दोष देत सुतारकामाचा व्यवसाय सुरू केला होता. बांगलादेश संघाविरुद्ध २०१७-१८ मध्ये झालेल्या मालिकेतून वगळल्यानंतर मॅथ्यू वेड म्हणाला होता की, “२०१७-१८ च्या बांगलादेश दौऱ्यानंतर मला वगळण्यात आले. त्यानंतर मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला आणि टास्मानिया येथील माझ्या घरी सुतार म्हणून काम करायला सुरुवात केली.”
कोणाला माहित होते की, हाच मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलिया संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडेल. मॅथ्यू वेडने पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या टी२० विश्वचषक उपांत्य सामन्यात निर्णायक क्षणी ३ षटकार मारले आणि ऑस्ट्रेलिया संघाचा अंतिम सामन्यात जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यातही तो मॅच विनिंग खेळी खेळण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
गेल्या ६ हंगामात ‘हे’ होते टी२० विश्वचषकाचे फायनलिस्ट, जाणून घ्या कोणत्या संघाने कधी मारलीय बाजी
काय सांगता! राहुल द्रविडच्या जागी ‘या’ ठिकाणी झाली व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड