बांगलादेशचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात कसोटी मालिका सुरू आहे. कसोटी मालिकेनंतर 6 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 टी20 सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेसाठी आज (28 सप्टेंबर) संध्याकाळी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात तरुण वेगवान गोलंदाज मयंक यादव याला संधी देण्यात आली आहे. तो बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.
मयंक यादवनं आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना सातत्यानं 150 किलोमीटर प्रतितास वेगानं गोलंदाजी केली होती. याशिवाय त्यानं पंजाब किंग्जविरुद्ध 155.8 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकला होता. याच कारणामुळे त्याची खूप चर्चा झाली होती. मात्र, काही सामन्यांनंतर तो दुखापतीचा बळी ठरला.
मयंक यादव रियान पराग आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत बंगळुरूच्या एनसीएमध्ये आपला फिटनेस पुन्हा मिळविण्यात व्यस्त होता. परंतु आता तो पूर्णपणे फिट झाला असून त्याला बांगलादेशविरुद्ध टी20 मालिकेतून भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांची मयंक यादववर विशेष नजर होती, असे बोलले जात होते. मयंक यापूर्वी लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळताना गंभीर आणि भारतीय संघाचा विद्यमान गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलच्या मार्गदर्शनाखाली खेळला आहे.
दरम्यान मयंक यादवनं आयपीएल 2024 च्या 4 सामन्यात 7 विकेट घेतल्या होत्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.99 असा उत्कृष्ट राहिला होता. तसेच मयंक यादवच्या देशांतर्गत कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने 1 प्रथम श्रेणी सामना खेळला असून 2 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 17 सामने खेळताना त्याने 34 फलंदाजांना बाद केले आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यास तो कसे प्रदर्शन करतो, हे पाहणे रोमांचक असेल.
बांगलादेशविरुद्धच्या 3 टी20 सामन्यांसाठी भारताचा संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधारपदी कायम
5 क्रिकेटपटू ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, नंतर फलंदाजीत कमावलं नाव
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं