आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) सामन्याच्या अंतिम चेंडूवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. सलग नवव्या सत्रात मुंबईने आपला पहिला सामना गमावला आहे. आरसीबीविरुद्धच्या या पराभवामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा खूप निराश आहे. मात्र सामन्यानंतर त्याने पहिला सामना जिंकण्यापेक्षा विजेतेपद जिंकणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
सामना संपल्यानंतर तो म्हणाला की, “मला असे वाटते की, पहिला सामना जिंकण्यापेक्षा विजेतेपद जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. माझ्या मते हा एक चांगला प्रयत्न होता. शेवटपर्यंत आम्ही लढा दिला. आमची सुरुवातही चांगली झाली, पण शेवटी 20 धावा करण्यात आम्ही अपयशी ठरलो. परंतु पहिल्या सामन्यात काही चुका होत असतात. यापुढे आम्ही त्यावर लक्ष देऊन पुढे जावू. मार्को जेन्सन हा एक प्रतिभावान गोलंदाज असून आम्ही त्याचा कोणत्याही परिस्थितीत उपयोग करू शकतो.”
तसेच तो म्हणाला की, “आपण शेवटच्या चार षटकांमधील परिस्थिती पाहिली. त्यांच्याकडे फलंदाजीकरीता एबी डिव्हिलियर्स आणि डॅन ख्रिश्चियन होते. आम्ही बुमराह आणि बोल्टच्या गोलंदाजीवर त्यांना बाद करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना बाद करणे सोपे नव्हते कारण तेथे चेंडू थांबून बॅटवरती येत होता. पण पुढील सामन्यांमध्ये आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवून उत्तम कामगिरी करू.”
एबी डिविलियर्स आणि हर्षल पटेलचा विजयात मोलाचा वाटा
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने या लक्ष्याचा पाठलाग करत सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. एबी डिव्हिलियर्स आणि हर्षल पटेलने यामध्ये मोलाचा वाटा उचलला. डिव्हिलियर्सने 27 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी करत मुंबईच्या तोंडून सामना हिसकावून घेतला. या फलंदाजी दरम्यान त्याने चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर दुसरीकडे हर्षल पटेलने आपल्या गोलंदाजीने सर्वाना आश्चर्यचकीत केले. त्याने त्याच्या चार षटकांत 27 धावा देऊन पाच बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात विराटच्या पलटणने उडवला मुंबईचा धुव्वा, ‘हे’ ठरले आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार