भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका केली. तिसऱ्या दिवशी ही घटना घडल्यानंतर भारतीय संघाने आयसीसीकडे याबाबत तक्रार देखील केली.
मात्र याची पुनरावृत्ती चौथ्या दिवशी देखील झाली. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला. या प्रकारानंतर सामना देखील काही काळ थांबवण्यात आला होता. या घटनेवर आता आजी-माजी खेळाडूंनी सडकून टीका होते आहे.
अशा प्रेक्षकांवर आजीवन बंदी घालावी
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसीने या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. अशा प्रेक्षकांवर आजीवन बंदी घालावी अशी मागणीही हसीने केली आहे. फॉक्स क्रिकेटवर बोलताना हसी म्हणाला, “ही अतिशय वाईट प्रकारची वर्तणूक आहे. आजच्या काळातही असे प्रकार घडत आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अशा प्रकारची टिप्पणी करणाऱ्या लोकांवर आजीवन बंदी घालायला हवी. त्यांना पुन्हा कधीही मैदानात सामना पाहण्यासाठी प्रवेश देऊ नये.”
भारतीय खेळाडूंचे आभारी असायला हवे
या प्रकरणात बोलताना हसी पुढे म्हणाला, “आपण भारतीय खेळाडूंचे आभार मानायला हवे. ते इथे आपले मनोरंजन करायला आणि आपल्या दर्जेदार क्रिकेट दाखवण्यासाठी आले आहेत. लाईव्ह सामना पाहायला मिळतो आहे, याबद्दल खरंतर आपण त्यांचे आभार मानायला हवे. खेळाडूंसह अशी वर्तणूक होणे, अजिबात सहन करू नये.”
हसी व्यतिरिक्त शेन वाॅर्नने देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. “आज जी घटना घडली, ती अतिशय शरमेची बाब आहे. या गोष्टी घडायला नको. विशेषतः गेल्या १२ महिन्यात जगाने जे पाहिले आहे, त्यांनतर तरी अशा गोष्टी घडायला नको”, असे मत वाॅर्नने व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या –
“टीम इंडिया दुसऱ्या डावात २०० धावा देखील करु शकणार नाही”, पहा कोणी केलंय हे वक्तव्य
आयपीएलच्या हंगामातून माघार घेणारा डेल स्टेन खेळणार पाकिस्तान सुपर लीगमध्ये
ही तर हद्द झाली! भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टीकेबद्दल कर्णधार विराट संतापला