सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या संघांदरम्यान प्रतिष्ठित ऍशेस मालिका (Ashes Series) खेळवली जात आहे. सबंध ऑस्ट्रेलियात मालिकेची चर्चा सुरू असताना, ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवणारी एक घटना समोर आली. ऑस्ट्रेलियाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व प्रसिद्ध समालोचक मायकल स्लेटर (Michael Slater) याला एका गंभीर गुन्ह्यात अटक झाली आहे. तसेच त्याचा जामीन देखील नामंजूर करण्यात आला आहे. संबंधित घटना या वर्षी ऑक्टोबर महिन्यात घडलेली.
काय आहे प्रकरण
जगप्रसिद्ध क्रिकेट समालोचक असलेल्या स्लेटर याच्यावर त्याच्या पूर्व पत्नीने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. याप्रकरणाची चौकशी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होती. पोलिसांनी त्यावेळी त्याच्यावर कारवाई देखील केलेली. मात्र, यानंतरही तो आपला पाठलाग करत असल्याचे त्याच्या पत्नीने म्हटले होते. त्यानंतर आता मॅन्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचा जामीन देखील मंजूर करण्यात आला नाही.
अनेक विवादांशी राहिले आहे नाते
आपल्या वाचाळ प्रतिक्रियांसाठी प्रसिद्ध असलेला स्लेटर अनेकदा वादांमध्ये राहतो. आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धानंतर सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक ऑस्ट्रेलियाला जात असताना मालदीव येथे स्लेटर व डेव्हिड वॉर्नर यांच्यात हाणामारी झाल्याचे वृत्त आले होते. तसेच, स्लेटर याने खुद्द ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी पंगा घेतलेला. त्याने तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत असे विधान केले होते. त्यानंतर त्याला संबंधित वाहिनीने समालोचक म्हणून करारातून मुक्त केलेले.
शानदार राहिली कारकीर्द
जवळपास १० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या स्लेटर याने आपल्या कारकीर्दीत ७४ कसोटी सामने करताना ५३१२ धावा काढल्या होत्या. तसेच, ४२ वनडे सामने खेळताना ९८७ धावा त्याने जमवल्या आहेत. त्याने आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत जवळपास १५००० धावा फटकावलेल्या. निवृत्तीनंतर तो प्रसिद्ध समालोचक म्हणून काम पाहतो. आयसीसी स्पर्धा तसेच अनेक फ्रॅंचाईजी क्रिकेट लीगमध्ये तो समालोचन करताना दिसून येतो.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट खेळणार संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा, पण वनडे कॅप्टन्सीबद्दल केले धक्कादायक खुलासे
अरर! दुसऱ्या ऍशेस कसोटीपूर्वी कर्णधार रुटला स्टोक्सनेच केले असते दुखापतग्रस्त, पाहा नक्की काय झाले