आयपीएलच्या यंदाच्या हंगामावरील कोरोनाचे सावट गडद होते आहे. खेळाडूंच्या आणि पंचाच्या माघारीनंतर आजचा आरसीबी विरूद्ध केकेआर सामना खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने रद्द करण्यात आला. मात्र या परिस्थितीत माघार घेतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी अडचणी येत आहेत. कारण ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणार्या विमानांना ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी केली आहे.
याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि आयपीएल मध्ये समालोचक म्हणून सहभागी असलेले मायकेल स्लेटर यांनी ऑस्ट्रेलियन सरकारवर तिखट शब्दात टीका केली आहे. मायदेशी परतण्यात येत असलेल्या अडचणी मांडत त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
ट्विट करत व्यक्त केला संताप
मायकेल स्लेटर हे यंदाच्या आयपीएल हंगामात समालोचक म्हणून सहभागी झाले होते. मात्र त्यांनी भारतातील कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणार्या प्रवाशांवर निर्बंध घातले होते. सरकारच्या या नियमांमुळे स्लेटर यांना मायदेशी परतता येत नाही आहे. सध्या ते मालदीव मध्ये अडकले आहेत.
याच परिस्थितीमुळे त्यांनी ऑस्ट्रेलियन सरकारवर सडकून टीका केली आहे. ट्विट करत ते म्हणाले, “जर आपल्या सरकारला आमच्या सुरक्षिततेबद्दल काही काळजी असती तर त्यांनी आम्हा ऑस्ट्रेलियन लोकांना मायदेशी परतण्याची मुभा दिली असती. हा अपमान आहे. पंतप्रधान, तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत. तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने कसे वागवू शकतात? तुम्ही विलगीकरणाचा पर्याय आजमावू शकत होते. मला सरकारने आयपीएल मध्ये भाग घेण्याची परवानगी दिली होती. पण परत येण्याची मात्र परवानगी दिली नाही.” अशा शब्दात स्लेटर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
If our Government cared for the safety of Aussies they would allow us to get home. It's a disgrace!! Blood on your hands PM. How dare you treat us like this. How about you sort out quarantine system. I had government permission to work on the IPL but I now have government neglect
— Michael Slater (@mj_slats) May 3, 2021
ऑस्ट्रेलियन खेळाडूंची झाली आहे अडचण
मायकेल स्लेटर यांच्याप्रमाणेच इतरही ऑस्ट्रेलियन खेळाडूंची अडचण झाली आहे. केन रिचर्डसन आणि एॅडम झाम्पा यांनी यापूर्वी आयपीएल मधून माघार घेतली होती. मात्र त्यांना देखील सरकारच्या नियमामुळे मुंबईत अडकून राहावे लागले. तर आयपीएल संपल्यानंतर देखील हा नियम शिथिल न झाल्यास उर्वरित ऑस्ट्रेलियन खेळाडूंची देखील मायदेशी परतण्याची अडचण होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
पंजाब किंग्जसाठी आनंदाची बातमी! या दिवशी केएल राहुल परतणार संघात
एका धावेने शतक हुकले, पण मयंकच्या नावे झाला हा कीर्तिमान
आयसीसी वनडे क्रमवारीत न्यूझीलंड संघ बनला चॅम्पियन, टीम इंडिया आहे या स्थानावर