इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत केले. यामध्ये भारतीय संघाने पहिल्या डावात केवळ ७८ धावा केल्या होत्या, ज्यामुळे भारतीय फलंदाजांवर टीका करण्यात येत आहे. या पराभवानंतर अनेक दिग्गजांनी आपापले मत व्यक्त केले आहे. त्यातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील त्याचे मत मांडले आहे.
वॉनच्या मते लॉर्ड्सवरील मोहम्मद शमीच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघ शेवटच्या फळीतील फलंदाजांना घेऊन आश्वस्त झाला होता. तसेच भारतीय संघाने जर पुढच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनला संघात सामील केले; तर त्यांची ही समस्या कमी होऊ शकते. शेवटच्या फळीत फलंदाज म्हणून तुम्ही असे खेळाडू ठेवू शकत नाही. जे फलंदाजीच्या तंत्रामध्ये खूप कमजोर आहेत, असेही त्याचे म्हणणे आहे.
याबाबत वॉनने एक फेसबुक पोस्ट करत लिहिले की, “निश्चितच त्यांना (भारतीय संघाला) पुढच्या सामन्यात अश्विनला निवडणे गरजेचे आहे. तुम्ही शेवटच्या फळीत (८ ते ११) फलंदाजीसाठी कमजोर खेळाडू ठेवू शकत नाही. लॉर्ड्समध्ये मोहम्मद शमीने एक उत्कृष्ट खेळी केली होती. यामुळे भारतीय संघ शेवटच्या फळीतील फलंदाजीबाबत आश्वस्त झाला असावा. खरेतर मोहम्मद शमीने ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी योग्य नाही.”
तसेच वॉन बीबीसीच्या कसोटी सामन्यासाठी समर्पित असलेल्या एका पॉडकास्टवर बोलताना म्हणाला, “अश्विनला अंतिम ११ मध्ये खेळवले गेले पाहिजे. भारतीय संघ लॉर्ड्सच्या सामन्यात वाचला. मात्र ८ व्या, ९ व्या, १० व्या आणि ११ व्या क्रमांकावर असे ४ खेळाडू तुम्ही खेळवू शकत नाही, जे फलंदाजीसाठी अत्यंत कमजोर आहेत. त्यामुळे अश्विनला खेळवावे. त्याने कसोटी सामन्यात ५ शतकेदेखील लगावली आहेत. तसेच त्याने कसोटी सामन्यात ४०० पेक्षा जास्त विकेट्स देखील घेतल्या आहेत. यामुळे त्याला पुढच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामील करून घेतले पाहिजे.”
“भारतीय ड्रेसिंग रूममध्ये अनुभवाची कोणतीही कमी नाही. या मालिकेतील शेवटचे २ सामने अत्यंत उत्कृष्ट ठिकाणी (मैदान) खेळविण्यात येणार आहेत. जिथे फिरकीपटू गोलंदाजांना भरपूर मदत मिळालेली आहे. जर गुरुवारी (२ सप्टेंबर) चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अश्विनला अंतिम ११ मध्ये न निवडल्यास हे माझ्यासाठी अत्यंत आश्चर्यकारक असेल,” असेही वॉन म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावला, ज्यामुळे या मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने १-१ ची बरोबरी साधली. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुढच्या कसोटी सामन्यात संघात मोठे बदल होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल झालेले दिसू शकतात.
पुढचे दोन्ही सामने आता महत्त्वाचे असणार आहेत. तसेच चौथा कसोटी सामना २ सप्टेंबरपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–स्कॉटलंडची टी२०त प्रशंसनीय कामगिरी, फ्रान्सला अवघ्या २४ धावांवर गुंडाळत ७ विकेट्सने जिंकला सामना
–‘या’ माजी क्रिकेटरचा पाकिस्तान संघाला धक्का, फेटाळला मुख्य प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव
–ओमानविरुद्ध जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी; मुंबईने ४ विकेट्सने जिंकला पहिला वनडे सामना






