सध्या मुंबईचा रणजी संघ ओमानच्या दौऱ्यावर आहे. ज्यामध्ये ओमान आणि मुंबई यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. यातील टी-२० मालिका मुंबई संघाने गमावली. मात्र, रविवारी (२९ ऑगस्ट) झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मुंबईने ओमानवर ४ विकेट्सने विजय मिळवला. सलामीवीर यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी करत मुंबईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात ओमानने प्रथम फलंदाजी करत ४७.१ षटकात १९६ धावा केल्या होत्या. यामध्ये ओमानच्या खालिद कैलने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तर ओमानचा कर्णधार कंवर अलीने ५२ धावा केल्या. त्याचबरोबर मुंबईकडून गोलंदाजी करताना शम्स मुलानीने ३ विकेट घेतल्या. तर शशांक अतार्डे आणि अमन खान यांनी २-२ विकेट घेतल्या.
यानंतर ओमानच्या १९७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाकडून यशस्वी जयस्वालने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ७९ चेंडूत ८२ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ५ चौकार आणि ५ षटकार लगावले. तसेच जयस्वालने मारलेला एक षटकार सरळ मैदानाच्या बाहेर जाऊन पडला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जयस्वालने मारलेला तो षटकार इतका लांब होता की, चेंडू स्टेडियमच्या बाहेरील पार्किंगमध्ये गेला होता. नंतर ओमानचे खेळाडू चेंडू आणताना देखील दिसले.
त्याचबरोबर मुंबईकडून हार्दिक तमोरेने ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबईने हा सामना ४३.४ षटकातच आपल्या खिशात घातला आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगचा आयपीएल दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यशस्वी जयस्वाल हा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. भारतात झालेल्या आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यामध्ये जयस्वालची म्हणावी तशी कामगिरी झाली नव्हती. त्याने ६ सामन्यात केवळ १०६ धावा केल्या होत्या. मात्र उर्वरित आयपीएल युएईमध्ये होणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये जयस्वाल चांगली खेळी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
–ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग ११
–‘क्रिकेटचे द्रोणाचार्य’ वासू परांजपे काळाच्या पडद्याआड; गावसकर, तेंडुलकरसारख्या दिग्गजांना केले होते मोलाचे मार्गदर्शन
–रवींद्र जडेजाने त्याची जर्सी दिली मायकल वॉनला; कारण जाणून वाटेल अभिमान