लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघावर आता सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी मजबूत स्थितीत असलेला इंग्लंडचा संघ जिंकेल असे वाटत असतानाच, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने इंग्लंडवर सोपा विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंड संघ आणि कर्णधार जो रूटवर टीका केली जात आहे.
यादरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने जो रूट त्याचे कर्णधारपद सोडू शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे. वॉनने टेलिग्राफच्या एका स्तंभात जो रूट आणि जेम्स अँडरसनसारख्या वरिष्ठ खेळाडूंबाबत मत मांडले आहे.
त्यामध्ये वॉनने लिहिले, “मला सध्या जो रूटची चिंता होत आहे. त्याला आता कर्णधारपद सोडावे असे वाटत असेल. जर त्याने केवळ २० कसोटी सामन्यामध्ये कर्णधार असताना सामना गमावला असता तर त्याने चांगले पुनरागमन केले असते. मात्र जेव्हा आता रूटने तब्बल ५४ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषविले आहे. अशावेळी सामना गमावल्यानंतर पुनरागमन करणे थोडे कठीण होऊन जाते.”
पुढे वॉनने लिहिले, “जो रूट थकला असेल. त्याला माहिती आहे या सामन्यात त्याने खूप चुका केल्या आहेत. यामुळे तो आता स्वतःवर संशय घेऊ लागला असेल. मला एक गोष्ट सगळ्यात जास्त चिंतेची वाटते ती म्हणजे, एका कर्णधाराला असे वाटते की त्याने चुका केल्या. त्याने सामन्यात चुकीचे निर्णय घेतले.”
“मात्र, त्यावेळी संघातील वरिष्ठ खेळाडूंनी त्याला समजावण्याचा प्रयत्न का केला नाही? एक कर्णधार म्हणून माझे एकच म्हणणे असेल, की माझ्या चुकीच्या निर्णयावर लोकांनी माझ्याजवळ यावे आणि मला समजावून सांगावे. मात्र रूटबाबत असे झाले नाही मग यावेळी वरिष्ठ खेळाडू कुठे होते?” अशी खोचक टीकाही वॉनने वरिष्ठ खेळाडूंवर केली.
तसेच वॉनने रूटला कर्णधारपद कायम ठेवण्याचा सल्ला देखील दिला. यावर त्याने लिहिले, “मला वाटते की रूटने याकाळात मजबूत बनवून उभे राहावे. मी हे म्हणत नाही की त्याच्यासाठी आता पुनरागमन करणे खूप सोपे आहे. मात्र त्याच्याजवळ आता गमावण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांची इच्छा आहे की, रूटने आता संघाला सोबत घेऊन भारताविरुद्धची ही मालिका जिंकावी. त्यानंतर ऑस्ट्रेलियामधील एशेस मालिकेवर देखील विजय मिळवावा.”
“त्याचबरोबर जो रूटला बेन स्टोक्स, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉडची या मालिकेत कमतरता जाणवत असेल.” असेही वॉने म्हणाला.
महत्वाच्या बातम्या –
–‘काय विजय आहे! काय संघ आहे!’; विराटसेनाच्या थरारक विजयाचे अनुष्काकडून तोंडभरुन कौतुक
–‘तुम्ही मुर्खपणा करत असाल, तर तुमची सामना जिंकण्याचीही लायकी नाही,’ दिग्गजाची इंग्लंडवर जहरी टीका
–लॉर्ड्सवरील शानदार कामगिरीने प्रभावित झाले बीसीसीआय अध्यक्ष, ‘असे’ ट्विट करत दिली शाबासकी