---Advertisement---

मोठी बातमी! आयपीएलच्या मध्यातच सीएसकेने नव्या खेळाडूला केले करारबद्ध, जाणून घ्या त्याविषयी

On: बुधवार, मे 13, 2026 1:30 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना शुक्रवारी (१५ मे) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध आहे. हा सामना लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी मोठे वृत्त समोर येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार, पाच वेळेच्या विजेत्या संघाने दुखापतग्रस्त रामकृष्ण घोषच्या जागी नव्या खेळाडूला करारबद्ध केले आहे.

सीएसकेने घोषच्या जागी उर्वरित सामन्यांसाठी कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू मॅकनील हॅडली नोरोन्हा याला करारबद्ध केले आहे. २८ वर्षीय घोषला पायाची दुखापत झाल्याने तो हंगामाबाहेर झाला आहे. त्याला २ मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यावेळी ही दुखापत झाली होती. विशेष म्हणजे त्याचा हा आयपीएलमधील पदार्पणाचा सामना होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी नोरोन्हासोबत करार झाल्याची पुष्टी केली आहे. फ्रॅंचायजीला आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. एकदा का मंडळाने मंजुरी दिली तर नोरोन्हा सीएसकेचा भाग असेल.

नोरोन्हा हा त्याच्या दमदार फटकेबाजी आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने २०२५ च्या महाराजा ट्रॉफीमध्ये मंगळुरू डॅग्रन्सला विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याने १३ सामन्यांमध्ये १४८.८२ च्या स्ट्राईक रेटने २५३ धावा केल्या. यामध्ये त्याने १९ षटकार मारले असून १० विकेट्सही घेतल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी तो कर्नाटक संघाचा भाग होता. त्याने त्यामधील तीन सामने खेळले होते.

सीएसके सध्या दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे त्रस्त आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून एमएस धोनी अद्यापही एकाही सामन्यात खेळला नाही. त्याला पोटरीची दुखापत झाली आहे. तसेच प्रमुख वेगवान गोलंदाज खलील अहमद, स्टार फलंदाज आयुष म्हात्रे हे दोघे दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले आहेत. त्याचबरोबर सीएसकेने नॅथन एलिसच्या जागी स्पेन्सर जॉन्सनला संघात घेतले होते, मात्र तो ही जखमी झाला.

आयपीएलच्या १९ व्या हंगामाची सुरूवात सीएसकेसाठी निराशाजनक झाली होती. त्यांनी पहिले तीन सामने गमावले होते, आता मात्र त्यांनी आपल्या शेवटच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत प्लेऑफ्सच्या पात्रतेच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्यांनी ११ पैकी ६ सामने जिंकले असून गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---