आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला २ कोटी २० लाख रुपयांच्या किमतीत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. स्मिथवर पहिली बोली लावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने माघार घेतल्याने तो दिल्लीकर झाला. आता, आरसीबीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स माईक हेसन यांनी स्मिथला आपल्या संघात का सामील करून घेतले नाही, याविषयीचे कारण सांगितले.
स्मिथवर लागली २.२० कोटींची बोली
आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथवर मोठी बोली लागेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष लिलावावेळी त्याची बोली २ कोटी २० लाख रुपयांपेक्षा जास्त गेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याच्या २ कोटी या आधारभूत किमतीवर प्रथम बोली लावली. त्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सने ही बोली वाढवली. परंतु, त्यानंतर कोणीही त्याला संघामध्ये घेण्यासाठी रस न दाखवल्याने, तो २.२० कोटी रुपये इतक्या किमतीत विकला गेला.
हेसन यांनी सांगितले कारण
आयपीएल लिलावात स्मिथवर पहिली बोली लावणाऱ्या आरसीबीने त्यानंतर त्याला का बोली लावली नाही? या प्रश्नाचे उत्तर आयसीसीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स माईक हेसन यांनी दिले आहे. हेसन यांनी स्मिथला खरेदी न करण्याविषयीचे कारण सांगताना म्हटले, “स्मिथला खरेदी न करण्याचे प्रमुख कारण होते की, तो गोलंदाजी करू शकत नव्हता. तो ज्या स्थानी खेळतो त्या स्थानी आधीपासूनच आमच्याकडे अनेक फलंदाज (विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडीक्कल) आहेत. तो अष्टपैलू असता तर त्याच्यावर विचार करावा लागला असता.”
भारतीय कर्णधार विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचला आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र, त्याला अपेक्षित कामगिरी न करता आल्याने संघाने त्याला करारमुक्त केले. याच कारणाने या वर्षी ते स्मिथवर बोली लावतील असा कयास लावला जात होता.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : विवादित झेलामुळे स्टोक्स होतोय ट्रोल, चाहत्यांनी केली पॉंटिंगशी तुलना
INDvsENG 3rd Test Live: रोहित शर्माचे दमदार नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसाखेर भारताच्या ३ बाद ९९ धावा
ईशांत शर्माने उलगडली धोनीसह खेळलेल्या त्या सामन्याची आठवण, भावूक होत म्हणाला