आयपीएल 2024 च्या 42व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्ससमोर पंजाब किंग्जचं आव्हान आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला जातोय. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं जेव्हा संघाची प्लेइंग 11 जारी केली, तेव्हा त्यात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचं नावं नव्हतं. स्टार्क प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोलकातानं त्याच्या जागी दुष्मंथा चमीराला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
नाणेफेकीच्या वेळी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “मिचेल स्टार्कला गेल्या सामन्यात बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो या सामन्यात आमच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. त्याच्या जागी दुष्मंथा चमीराला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं आहे”. मात्र, मिचेल स्टार्कची दुखापत किती गंभीर आहे हे श्रेयस अय्यरनं नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट केलं नाही.
मिचेल स्टार्कनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात शेवटचं षटक टाकलं होतं. या षटकात त्याला 21 धावांचा बचाव करायचा होता. मात्र या षटकात कर्ण शर्मानं त्याला 3 षटकार ठोकले. या रोमहर्षक सामन्यात केकेआरनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला होता.
मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला आयपीएल 2024 पूर्वी झालेल्या लिलावात विक्रमी 24.75 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केलं होतं. मात्र, या हंगामात आतापर्यंत स्टार्कची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. विशेषत: त्याच्या चेंडूंवर विरोधी फलंदाजांनी भरपूर चौकार आणि षटकार ठोकले आहेत.
मिचेल स्टार्कची या हंगामातील इकॉनॉमी खूपच खराब आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 11.48 च्या इकॉनॉमीनं 6 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 47.83 एवढी राहिली.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रुणाल पांड्याच्या घरी पुन्हा पाळणा हालला! पत्नी पंखुडीनं दिला दुसऱ्या मुलाला जन्म
उसेन बोल्टनंतर आता युवराज सिंग बनला टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर, आयसीसीची घोषणा