इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला यांच्यादरम्यानची वनडे मालिका नुकतीच पार पडली आहे. शनिवारी (३ जुलै) वॉर्सेस्टर येथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्याने या मालिकेची अखेर झाली. कर्णधार मिताली राज हिच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने ४ गडी राखून इंग्लंडवर मात केली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडने यापूर्वीच मालिका आपल्या नावे केली होती. भारताच्या विजयाची नायक ठरलेल्या मिताली राजने या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. आता तिने या विक्रमानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मितालीचे महिला क्रिकेटवर राज
इंग्लंडने दिलेल्या २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मितालीने ७५ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात अर्धशतक पूर्ण करताच ती आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारी क्रिकेटपटू बनली. तिने १०२७३ धावा नावावर असलेली इंग्लंडचे माजी कर्णधार चार्लेट एडवर्डस हिला मागे टाकत १०३३७ धावांचा नवा विक्रम बनवला. कर्णधार म्हणून देखील तिने या सामन्यात ६००० धावांचा टप्पा पार केला.
माझ्यात अजूनही धावांची भूक
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तिने या विक्रमी कामगिरीविषयी बोलताना म्हटले, “आतापर्यंतचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. या काळात माझ्यासमोर अनेक अडचणी आणि आव्हाने आली. मात्र, मी त्याचा समर्थपणे सामना करू शकले. माझी धावांची भूक अजूनही कमी झाली नाही. मला अजूनही वाटते की मी मैदानात असावी आणि देशासाठी धावा बनवाव्यात. विश्वचषकापूर्वी मी माझ्या फलंदाजीत असलेल्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करेल.”
"The hunger to score runs for India has never dried up." 💪@M_Raj03 reflects on her 22-year journey after becoming the leading run-scorer in women's international cricket 📽️ pic.twitter.com/ynypyL4v0C
— ICC (@ICC) July 4, 2021
मितालीने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्षे पूर्ण केली आहेत. तीने १६ वर्ष २०५ दिवसांची असताना पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. २०२२ मध्ये न्यूझीलंड येथे होणारी महिला वनडे विश्वचषक स्पर्धा खेळून आपण निवृत्त होणार असल्याचे तिने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका-भारत मालिकेसाठी समालोचकांच्या पॅनेलची घोषणा, आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ शिलेदाराचाही समावेश
खुलासा: २००७ विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर द्रविडने इरफान अन् धोनीला नेले होते ‘या’ ठिकाणी
‘पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलावणे म्हणजे इतर खेळाडूंचा अपमान,’ विश्वविजेता कर्णधार संतापला