क्रिकेटविश्वात सध्या टी२० क्रिकेटचे वारे वाहत आहेत. सर्वत्र टी२० स्पर्धा सुरू असलेल्या दिसून येत आहे. पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसत आहेत. दरम्यान, या स्पर्धेत लाहोर कलंदर्स संघाकडून खेळणाऱ्या मोहम्मद हाफिजने (Mohammad Hafeez) टी२० क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
प्रोफेसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाफिजने पीएसएलच्या (PSL 2022) क्वालिफायर सामन्यात मुल्तान सुल्तानविरुद्ध शान मसूदला बाद करतानाच टी२० क्रिकेट कारकिर्दीत २०० विकेट्स पूर्ण केल्या. त्यामुळे टी२० क्रिकेटमध्ये २०० विकेट्स आणि ७००० धावा करणारा तो पहिला पाकिस्तानी, तर जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्यापूर्वी, असा विक्रम कायरन पोलार्ड, रवि बोपारा आणि शेन वॉटसन यांनी केला आहे (7000 runs and 200 Wickets in T20s).
४१ वर्षीय हाफिजने त्याच्या टी२० क्रिकेट कारकिर्दीत ३६५ सामने खेळताना २५.६२ च्या सरासरीने ७७१४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ शतकांचा आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने २३.७५ च्या सरासरीने २०० विकेट्स घेतल्या आहेत.
हाफिजने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण, तो टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो.
टी२० क्रिकेटमध्ये ७००० धावा आणि २०० विकेट्स घेणारे खेळाडू
११४२७ धावा आणि ३०४ विकेट्स – कायरन पोलार्ड (५८१ सामने)
८८२१ धावा आणि २१६ विकेट्स – शेन वॉटसन (३४३ सामने)
७९८७ धावा आणि २४५ विकेट्स – रवि बोपारा (४११ सामने)
७७१४ धावा आणि २०० विकेट्स – मोहम्मद हाफीज (३६५ सामने)
लाहोर कलंदर्सचा पराभव
क्वालिफायर सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास मुल्तान सुल्तानने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकांत २ बाद १६३ धावा केल्या. यामध्ये संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि रिली रोसौवने नाबाद अर्धशतकी खेळी केल्या. रिझवानने ५३ आणि रोसौवने ६५ धावांची नाबाद खेळी केली. तसेच आमेर अजमतने ३३ धावांचे योगदान दिले, तर शान मसूदला २ धावाच करता आल्या. लाहोर कलंदर्सकडून मोहम्मद हफीज आणि समीत पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लाहोर कलंदर्सला २० षटकात ९ बाद १३५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून फखर जमानने एकाकी झुंज देताना ६३ धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणालाही खास कामगिरी करता आली नाही. हाफीज तर शुन्यावर बाद झाला. त्यामुळे लाहोरला २८ धावांनी पराभव स्विकारावा लागला. मुल्तान सुल्तानकडून शाहनवाज दहनीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात ‘हिटमॅन’ला मोठा विक्रम करण्याची संधी; फक्त १२ षटकार दूर
‘मास्टर ब्लास्टर’चे सोशल मीडियावरून आवाहन; म्हणाला, ‘कधीच दारू, जुगार अन् तंबाखूची…’
जेव्हा भेटले दोन ‘खिलाडी’…! सोशल मीडियावर व्हायरल होतोय एमएस धोनी आणि अक्षय कुमारचा फोटो