पुढील महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बांगलादेश भारताविरुद्ध 3 सामन्यांची टी20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 3 नोव्हेंबरपासून टी20 मालिका सुरु होईल.
पण ही मालिका सुरु होण्याआधीच बांगलादेशला एक धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद सैफुद्दीन या टी20 मालिकेतून पाठिच्या दुखापतीमुळे या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.
सैफुद्दिनला याआधीही पाठीच्याच दुखापतीमुळे इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडावे लागले होते. तसेच त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिकेलाही मुकला होता.
त्याच्या पाठीच्या दुखापतीसाठी अनेक स्कॅन करण्यात आले आहेत. या स्कॅनच्या रिपोर्टनुसार त्याला अजून या दुखापतीतून सावरण्यास वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बांगलादेशचे फिजिओथेरपिस्ट जूलियन कॅलेफॅटो सैफुद्दिनच्या दुखापतीबद्दल म्हणाले, ‘त्याला पुन्हा एकदा पाठीची दुखापतीचा त्रास होत असल्याने भारत दौऱ्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे त्याला त्याच्या दुखापतीतून बाहेर येण्याची संधी मिळेल.’
तसेच वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर पुढील काही आठवडे लक्ष ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.
मात्र सैफुद्दिन भारत दौऱ्यातून बाहेर पडला असला तरी त्याचा बदली खेळाडू म्हणून कोणत्याही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही.
बांगलादेशचा संघ या दौऱ्यासाठी 30 ऑक्टोबरला भारतात येण्याची शक्यता आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 नोव्हेंबरपासून टी20 मालिकेने होईल. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीला होणार आहे. त्यानंतर 7 आणि 10 नोव्हेंबरला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा टी20 सामना राजकोट आणि नागपूरला होईल.
त्यानंतर कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. पहिला कसोटी सामना 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान इंदोरला होणार आहे. त्यानंतर 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना कोलकताला होणार आहे.






