अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohmmed Shami) रणजी ट्रॉफीत ‘सर्विसेस’ विरुद्ध खेळताना आपल्या घातक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले आहे. बंगालकडून खेळणाऱ्या शमीने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या असून, या सामन्यात त्याने आतापर्यंत एकूण 7 बळी मिळवले आहेत. या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बंगालने पहिल्या डावात 519 धावांचा डोंगर उभा केला होता. सर्विसेसचा पहिला डाव 186 धावांवर आटोपला, ज्यात शमीने 2 विकेट्स घेतल्या. फॉलो-ऑन मिळाल्यावर खेळताना सर्विसेसच्या दुसऱ्या डावात शमीने 5 फलंदाजांना तंबूत धाडले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सर्विसेसने 231 धावांवर 8 विकेट्स गमावल्या होत्या.
मोहम्मद शमी गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने जून 2023 मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये तो दिसला, पण तेव्हापासून त्याला संधी मिळालेली नाही. “माझे काम मैदानात कामगिरी करणे आहे,” असे शमीने अनेकदा बोलून दाखवले आहे. या 7 विकेट्स घेऊन त्याने आपण अजूनही ‘मॅचविनर’ असल्याचे सिद्ध केले आहे.
सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे, त्यानंतर 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कप सुरू होईल. त्यानंतर आयपीएलमध्ये शमी ‘लखनऊ सुपर जायंट्स’ कडून खेळताना दिसेल. भारताचा इंग्लंड दौरा जुलैमध्ये असून तिथे 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. शमीला त्या मालिकेत संधी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीने 64 कसोटी सामन्यांमध्ये 229 विकेट्स घेतलेल्या आहेत, तर 108 वनडे सामन्यात 206 विकेट्स तर, 25 टी-20 सामन्यात त्याने 27 विकेट्स घेतल्या आहेत.






